पान:माझे चिंतन.pdf/३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नरोटीची उपासना २१ 

मुळीच नाही. मार्क्सवाद, लोकसत्ता हे जे नवे युगधर्म त्याने स्वीकारले आहेत, त्यांचे प्रतिपालनही तो याच सनातन पद्धतीने करीत आहे.

मार्क्सधर्माचे जडरूप

 भांडवलशाही नको असे मार्क्स का म्हणाला १ अल्पसंख्यांच्या हाती सर्व धन एकवटते आणि मग ते त्याच्या जोरावर सत्ता काबीज करून इतरांना छळतात, नागवितात म्हणून. रशियाने मार्क्सवाद स्वीकारला. भांडवलदार, जमीनदार नष्ट केले. पण सर्व धन पुन्हा सत्ताधारी अल्पसंख्यांच्या हातीच आणून ठेविले. पूर्वी भांडवलदारांचे राजसत्तेवर वर्चस्व असे, पण ते दूरतः अप्रत्यक्षपणे असे, आता सत्ता व धन एकाच अल्पसंख्य गटाच्या हाती देऊन रशियाने जास्तच भयानक परिस्थिती निर्माण केली आहे. तरी पण आपण मार्क्सधर्म पाळीत आहोत, हे त्याचे समाधान अभंग आहे ! भांडवलदार नष्ट केल्यानंतर सैन्य, पोलीस, तुरुंग ही चोवीस तासांच्या आत नाहीशी केली पाहिजेत, कारण यांच्याच बळावर सत्ताधारी लोक नागरिकांना छळीत असतात, ही मार्क्सची पहिली अट रशियाच्या धुरीणांनी दृष्टीआड केली आहे. मार्क्स म्हणाला की, भांडवलशाही नष्ट केल्यावर कामगारांचे राज्य झाले पाहिजे. सर्व दलितांच्या व्यक्तिमत्त्वविकासाला अवसर मिळावा, जीवनाची, उत्कर्षाची किमान साधने सर्वांना सुलभ व्हावी हा त्याचा तसे सांगण्याचा हेतू होता. रशियात ' कामगारांचे राज्य ' या घोषणा चालू आहेत. कामगारांना मतदानाचा अधिकार दिला आहे. पण कारखाने व एकंदर कारभार यांचे नियंत्रण सरकारने स्वतः नेमलेल्या अधिकाऱ्यांकडे देऊन सर्व सुलतानी अधिकार त्यांच्याकडे सुपूर्द करून या कामगारराज्याचा हेतू विफल करून टाकला आहे. राजसत्तेचे अधिकार राहोच, साधा संप करण्याचा अधिकारही कामगारांना नाही. त्यांना फक्त स्टॅलिनचा जयजयकार करण्याचा व परदेशातल्या प्रवाशांच्या पुढे आपल्या सुखाचे प्रदर्शन मांडण्याचा अधिकार आहे. मार्क्सधर्माचे पालन ते हेच.
 मार्क्सधर्मात क्रांती, उत्पात, स्फोट, विध्वंस यांना फार महत्त्व आहे. विरोध- विकासवाद हे या धर्मातील आदितत्त्व आहे. जगाची प्रगती साध्या विकास पद्धतीने न होता दर वेळी संघर्ष, द्वंद्व, उत्पात होऊन त्यातून प्रगती होते असे मार्क्सधर्म सांगतो. यातील जगाची प्रगती, हा आत्मा काढून टाकून विध्वंस, अत्याचार, दंगेखोरी, बेदिली, फूट, एवढ्याचा मात्र कम्युनिस्ट लोक दर ठिकाणी, जुन्या