पान:माझे चिंतन.pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 २० माझे चिंतन


तत्त्वांना जडरूप

 पण माणसाच्या मनाची ही ठेवणच होऊन बसली आहे. आपल्या कृती व त्यांच्यामागील प्रेरक हेतू यांच्यांत विसंगती निर्माण होत नाही ना हे पाहात राहणे त्याला नको असते. त्याची दगदग त्याला झेपत नाही. नित्य जागरूक राहणे ही फिकीर त्याला सोसत नाही. सामान्य जनांना ही नाहीच सोसत पण समाजधुरीणही तिचा कंटाळा करतात. किंवा ती सोसण्याची ऐपत त्यांच्या ठायीही नसते. म्हणून ते थोर तत्त्वांना जडरूप देतात आणि तोच खरा धर्म असे स्वतःच्या मनाचे समाधान करतात. अकबराच्या स्वाऱ्यांमुळे राणा प्रतापसिंहजी यांना चितोड सोडून रानोमाळ भटकावे लागत होते. आणि अखेरीस चितोड परत घेण्याची त्यांची आकांक्षा तृप्त न होताच त्यांना कालवश व्हावे लागले. त्यावेळी त्यांचे अनुयायी, त्यांचे वारस, वंशज यांनी प्रतिज्ञा केली की, चितोड परत मिळेपर्यंत आम्ही गवतावर निजू. गादीवर निजणार नाही. पानावर जेवू, चांदीच्या ताटात जेवणार नाही. पुढे ही घोर प्रतिज्ञा पार पाडण्याचे सामर्थ्य त्यांच्या वंशजांत राहिले नाही. आणि प्रतिज्ञा पार पाडीपर्यंत ते बिकट व्रत संभाळण्याचा कणखरपणा, ती तीव्र निष्ठा त्यांच्या ठायी नव्हती. तेव्हा त्यांनी निष्ठेला जडरूप दिले. ते मांडलिक म्हणून चितोडला परत आले. सुखासीन झाले, गादीवर निजू लागले, चांदीच्या, सोन्याच्या ताटात जेवू लागले. पण त्यांनी व्रतही चालविले. म्हणजे काय केले ? मऊ परांच्या गादीखाली ते थोडेसे गवत घालून ठेवीत व मग निजत आणि सोन्याच्या ताटाखाली एक वडाचे पान ठेवून मग जेवीत. अशा रीतीने गवतावर निजू व पानावर जेवू ही व्रते त्यांनी अखंड आचरिली. नरोटीची उपासना ती हीच. त्या व्रतांतला स्वाभिमान, त्याग, तेज हा आत्मा नष्ट झाला होता. ते श्रीफल राणाजींच्या प्राणज्योतीबरोबरच अंतर्धान पावले होते. फक्त शब्द राहिले होते. व्रताची यांत्रिक कृती उरली होती. कलेवर शिल्लक होते. पण आपण प्रतिज्ञेचे पालन करीत आहो, आपण तिच्याशी द्रोह केलेला नाही, ही त्या वंशजांची श्रद्धा तरीसुद्धा कायम होती.
 मनुष्याच्या मनाचे हे जे दौर्बल्य, सत्त्वापासून, स्वधर्मापासून च्युत होऊन जडाची उपासना करीत असताना आपण धर्माचीच उपासना करीत आहोत असे समाधान मानण्याची ही जी वृत्ती ती अर्वाचीन काळी कमी झाली आहे असे