पान:माझे चिंतन.pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नरोटीची उपासना १९  

हृदयाचा, सद्गुणांचा विकास आहे, असे कोणाच्या मनातही आले नाही. धर्म म्हणजे संयम, निग्रह, भूतदया, परमेश्वरावरील श्रद्धा, सत्यनिष्ठा, दया, क्षमा, शांती, विद्येचा अभिलाष, स्वत्वाचा अभिमान असे अर्थच त्यावेळी कोणी केले नाहीत. जडदेहाच्या संस्कारापलीकडे धर्म म्हणजे काही आहे अशी या जनांची समजूत असती तर त्यांनी आपला मुलगा निग्रही नाही, दयाशून्य आहे, स्वत्वशून्य झाला आहे, अशा तक्रारी केल्या असत्या. पण त्या काळच्या वाङ्मयात अशा तक्रारी सापडत नाहीत. धर्म म्हणजे केवळ जड आचार, याचा मनाशी, संस्कृतीशी काही एक संबंध नाही, इतक्या विपरीत टोकाला काही जनांची बुद्धी गेल्याची साक्ष संस्कृतात आहे. एकादशीचे महत्त्व सांगताना-

वरं हि मातृगमनं वरं गोमांसभक्षणम्
ब्रह्महत्त्या, सुरापानं, एकादश्यां न भोजनम् ।

असे कालतरंगिणीकाराने म्हटले आहे. जगातली अत्यंत भयानक व किळसवाणी अशी पापे केली तरी चालतील, पण एकादशीला जेवलेले चालणार नाही, असा त्याचा अभिप्राय आहे. आणि जेवणे याचा अर्थ भातभाकरी खाणे ! बटाटे, साबूदाणा इत्यादी पदार्थ खाणे हे भोजन नव्हे. जड, शारीर आचाराला, धर्माच्या बाह्यस्वरूपाला, माणसे किती महत्त्व देऊ लागली होती आणि तसे करताना त्यांची बुद्धी किती बहकली होती, किती पतित झाली होती ते यावरून कळून येईल.
 कोणत्याही समाजाच्या ऱ्हासकाळाचे हे प्रधानलक्षण आहे. या काळी तो समाज मूलतत्त्वांपासून लांब जाऊन जडाचा उपासक बनतो. बहुतेक सर्व तत्त्वे, संस्था, निष्ठा या प्रथम मानवाच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या असतात. सर्व मानवांना इहलोकीची व परलोकीची सुखे मिळावी, त्यांच्यांत प्रेमभाव नांदावा, समाजाचे रक्षण व्हावे, त्यात समता, बंधुता, स्वातंत्र्य ही नांदावी, प्रत्येकाला उन्नतीला अवसर मिळावा इत्यादी अनेक हेतू मूळ प्रवर्तकाच्या मनात असतात. त्यासाठी तो काही सिद्धान्त सांगतो, एखादी संस्था किंवा मठ स्थापन करतो, काही आचार आवश्यक म्हणून सांगतो आणि प्रारंभीच्या काळात तो अंतिम हेतू लोकांच्या मनात असेपर्यंत त्या संस्थेचा कारभार व लोकांचे आचार यांना अर्थ असतो. पण पुढे पुढे मूळ हेतू हा जो आत्मा तो नाहीसा होऊन केवळ कलेवर शिल्लक राहते. ते कुजू लागले तरी लोक त्यालाच लोभावलेले असतात. आणि मग त्याच्या दुर्गंधीने, त्यातील जंतूंमुळे समाजपुरुषाचा नाश होतो.