पान:माझे चिंतन.pdf/३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १८  माझे चिंतन

भक्षण, अपेयपान करायला लावले असते. त्यांच्या शेंड्या कापल्या असत्या, त्यांची जानवी तोडली असती, त्यांना लुंग्या नेसविल्या असत्या. पण अंतरांतल्या धर्मनिष्ठेला त्याला काडीमात्र धक्का लावता आला नसता. पण तीवर धर्म अवलंबून नाहीच मुळी ! एखाद्याने गंध, शेंडी, जानवे, गोमूत्र पिण्याचा अधिकार यांना हात लावला नाही की त्याने आमच्या धर्मात हात घातला नाही असे होते. आणि दुसऱ्या कोणी त्यांची छाटाछाट केली की त्याने आमचा धर्म बुडविला असे ठरते. काशीक्षेत्र हिंदुराज्यात यावे, तेथील प्रजेच्या स्वत्वाचे रक्षण व्हावे, तिला स्वाभिमानाने जगता यावे, मुसलमानांनी चालविलेल्या अत्याचारांना पायबंद बसावा, आपल्या स्त्रियांचे विटंबनेपासून रक्षण व्हावे, पुढेमागे रामाची अयोध्याही हिंदुराजाच्या राज्यात येऊन रामचंद्रांच्या जन्माच्या जागी मशीद आहे ती जाऊन तेथे त्याचे मंदिर व्हावे, काशीविश्वेश्वराच्या देवळाच्या निम्म्या भागात मशीद आहे ती दूर व्हावी याचा हिंदुधर्माशी काही संबंध आहे असे त्या ब्राह्मणांचे मुळींच मत नव्हते. शेंडी, गंध, गोमूत्र, पंचगव्य यावरच सर्व धर्म अवलंबून आहे, त्यांचे पालन, त्यांची उपासना हीच खरी हिंदुधर्माची उपासना अशी त्यांची श्रद्धा असल्यामुळे मुसलमानांचेच राज्य कायम ठेवावे अशी त्यांनी हिंदुराजाला प्रार्थना केली. आणि त्यानेही ती ऐकली !

धर्मभ्रष्ट म्हणजे काय ?

 पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी इंग्रजी विद्येचा आपल्या देशात प्रसार होऊ लागला आणि त्यामुळे नवे आचार-विचार सुरू झाले. त्यावेळी धर्म बुडाला, आता कलियुग आले, विनाशकाल जवळ आला असे उद्गार सर्वत्र सनातनी लोकांच्या तोंडून ऐकू येऊ लागले. घरोघरी आईबाप आपली मुले धर्मभ्रष्ट झाली- त्यावेळच्या भाषेत- सुधारक झाली, असे म्हणू लागले होते. त्यावेळी मुले धर्मभ्रष्ट झाली म्हणजे काय झाले, असे जर त्यांना कोणी विचारले असते तर त्यांनी काय उत्तर दिले असते ? विश्वनाथ नारायण मंडलीक, दादोबा पांडुरंग यांच्या चरित्रात ही उत्तरे सापडतात. अमक्या दिवशी हजामत करणे निषिद्ध असताना ती केली, अमक्या वारी अमुक खावयाचे नसताना खाल्ले, घेऱ्याचा आकार कमी केला, एकादशीला बटाटे, रताळी हे खाण्याऐवजी मुळे, गवारी, गहू हे खाल्ले, अशा स्वरूपाच्या त्या तक्रारी होत्या. धर्म म्हणजे मानसिक उन्नती आहे, धर्म म्हणजे