पान:माझे चिंतन.pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नरोटीची उपासना १७  

त्यात धर्मनिष्ठेला बाध आल्यासारखे होत नाही अशी त्यांची समजूत होती. आणि समाजाचीही वृत्ती तशीच होती. मिर्झा राजे किंवा स्वरूपचंद, अमीरचंद यांना त्या काळात धर्मभ्रष्ट असे कोणीच म्हटले नाही.
 १७४२-४३ साली नानासाहेब पेशवे उत्तर हिंदुस्थानात स्वारीला गेले होते. यावेळी हिंदूंची तीर्थस्थळे, प्रयाग, काशी वगैरे क्षेत्रे मुसलमानांच्या अमलातून सोडवावी असा त्यांचा विचार होता. त्याप्रमाणे फौज घेऊन ते काशीक्षेत्राकडे निवाले. त्यावेळी काशीक्षेत्र यवनांच्या राज्यातून मुक्त करून ते हिंदूंच्या आधिपत्याखाली आणण्याचा त्यांचा मनोदय विफल करण्याची व ते हिंदूंचे क्षेत्र मुसलमानांच्याच वर्चस्वाखाली राहील अशी व्यवस्था करण्याची कामगिरी कोणी केली ? काशीच्या त्यावेळच्या ब्राह्मणांनी ! त्यावेळचा नबाब सफदरजंग याने त्या ब्राह्मणांना अशी धमकी दिली की तुमच्या राजास आमचे मुलखातून परत फिरवा; नाही तर तुम्हांला बाटवून सर्वांना मुसलमान करतो. त्यामुळे काशीकर ब्राह्मण हे नारायण दीक्षित कायगावकर यांना पुढे घालून रडत, भेकत पेशव्यांच्याकडे आले आणि पाया पडून, विनवण्या करून, त्यांनी पेशव्यांना परत जायला लावले.
विपरीत श्रद्धा
 धर्म हा खाण्यापिण्यावर, शेंडीगंधावर, सोवळ्याओवळ्यावर - म्हणजे जड बाह्यस्वरूपावरच अवलंबून आहे, आंतरिक निष्ठेचे त्यात महत्त्व नाही अशी विपरीत श्रद्धा निर्माण करून हिंदुधर्माने स्वतःच्या आसनाखाली एक कायमचा सुरूंग लावून ठेवला आहे. त्यामुळे स्त्रीला ज्याप्रमाणे इच्छा नसली तरी बलात्कार करणाऱ्या पुरुषाचा गर्भ धारण करावा लागतो, त्याप्रमाणे हिंदुधर्मीयाला आपली मुळीच इच्छा नसली तरी परक्याचा धर्म स्वतःवर लादून घ्यावा लागतो. स्वधर्मावर त्याची कितीही श्रद्धा असली, त्यासाठी आत्मार्पण करण्यासही तो सिद्ध असला तरी त्याचा उपयोग नाही. हिंदू राहणे न राहणे हे त्याच्या हाती नाही. मुसलमानांना वाटले याला मुसलमान करावे तर हिंदूला मुसलमान झाले पाहिजे. ख्रिस्त्यांना वाटले, याला ख्रिस्ती करावे तर त्याला प्रभू येशूच्या गटात गेले पाहिजे. कारण धर्म ही नरोटीची उपासना आहे, श्रीफलाची नव्हे अशी हिंदूंची श्रद्धा आहे. काशीच्या ब्राह्मणांना असे वाटत नसते तर त्यांना भीती कशाची होती ? नबाबाने त्यांना बाटवले असते म्हणजे काय केले असते? काही अभक्ष्य-