पान:माझे चिंतन.pdf/२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १६  माझे चिंतन

कडून मिळवून त्या ब्रिटिशांना पुरवीत. लॉर्ड क्लाईव्ह याने गुप्त घराण्यातील जगत्-शेट व अमीरचंद यांना दिलेल्या शिफारसपत्रात म्हटले आहे की, ' पूर्वेकडील मुलखाची बातमी आम्हांस पुरविण्यासाठी तुम्ही स्वतंत्र टपालच उघडण्याचे ठरविले आहे व सर्व सरदार व रयत यांना आपले पैसे खर्चून आमच्या अमलाखाली शरण आणण्याचा आपला बेत आहे हे ऐकून आम्हांला फार आनंद होतो.' १८१७ साली खडकीची लढाई झाली. त्या वेळी एक अत्यंत महत्त्वाची गुप्त बातमी आयत्यावेळी कळविण्याची कामगिरी या घराण्याने केली. तीसंबंधी जेंकिन्स लिहितो - ' ही बातमी अशी वेळेवर न मिळती तर आम्हांस जय मिळविण्यास फार काळ लागता व सायास पडते.' ग्वाल्हेरचा किल्ला ब्रिटिशांनी घेतला तेव्हा महाराजाधिराज सवाई शिकंदर स्वरूपचंद गुप्ता यांनी किल्ल्यावर जाण्यासाठी एक चोरवाट होती ती अत्यंत प्रयासाने समजून घेऊन ब्रिटिशांना तिची माहिती दिली. त्यामुळे तो किल्ला विनाश्रम ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
 हे गुप्ता घराणे अत्यंत धर्मनिष्ठ म्हणून त्यावेळी नावाजले होते. आश्चर्य असे की ब्रिटिशांना साह्य करताना वेळोवेळी जे यांचे करारमदार झाले त्यात त्यांनी एक अट ब्रिटिशांना नेहमी घातलेली आहे की, ' तुम्ही आमच्या धर्मात कधीही हात घालू नये.' आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना तशी आश्वासनेही दिली आहेत. आपण परक्यांना द्रव्यसाह्य केले, येथे सरदार व रयत यांना परक्यांना शरण जाण्यास भाग पाडिले, आपल्याच लोकांवर हेरगिरी करून त्यांच्या गुप्त बातम्या इंग्रजांना दिल्या, किल्ल्याच्या चोरवाटा दाखवून मूळ मालकांना दगा केला तरी आपण यात काही धर्महानी केली, धर्मद्रोह केला असे गुप्तांना वाटले नाही. आणि इंग्रजांनी येथल्यांचे स्वातंत्र्य हिरावले, धन लुबाडले, छळ केला, अनन्वित क्रूर कृत्ये केली तरी त्यांनी धर्मात हात घातला नाही, असेच त्यांचे मत होते. तोंडावर पट्टी बांधू दिली, उपासतापास करू दिले, सणवार पाळू दिले, श्वेतांवर, दिगंबर हे भेद कायम ठेवू दिले, मंदिरे बांधू दिली, तेथे पूजाअर्चा करू दिली म्हणजे इंग्रजांनी धर्मात हात घातला नाही, ते अलिप्त राहिले अशी गुप्तांची श्रद्धा होती. आणि अशी काळजी घेतल्यानंतर आपण प्रत्यक्ष व्यवहारात स्वदेश, स्वजन यांशी कसलाही द्रोह केला, त्याचा परिणाम म्हणून येथल्या समाजाचे स्वातंत्र्य गेले, त्याची अन्नान्नदशा झाली, त्याची लूट झाली, नागवणूक झाली,- इंग्रज हे सर्व करीत होते हे गुप्ता प्रत्यही पाहातच होते- तरी