पान:माझे चिंतन.pdf/२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नरोटीची उपासना १५  


नरोटी

 कोणत्याही समाजाची धारणा व्यवस्थित व्हावी, त्याचा योगक्षेम नीट चालावा त्याची उन्नती व्हावी यासाठी त्यातील धुरीणांनी वेळोवेळी काही तत्त्वे मनाशी निश्चित करून त्याअन्वये काही नियम, काही शासने सांगितलेली असतात. त्या शासनांच्या मागची जी तत्त्वे, त्यांचा जो मूळ हेतू त्याकडे लक्ष ठेवून जोपर्यंत समाज त्यांचे पालन करीत असतो तोपर्यंत फलदायी होतात. समाजाच्या धारणपोषणास, रक्षणास, अभ्युदयास त्यांचे साह्य होते. पण कालांतराने स्वार्थामुळे, मोहामुळे, अज्ञानामुळे, आळसामुळे, श्रद्धाशून्यतेमुळे त्या मूळतत्त्वांचा विसर पडून समाज त्या शासनाच्या केवळ जडस्वरूपाचा उपासक बनतो. तो फक्त त्याची चौकट, त्याचा सांगाडा, त्याचे बाह्यरूपच तेवढे जाणतो. अंतरीचे तत्त्व, त्याचा आत्मा तो जाणीत नाही. नारळाची नरोटीच फक्त त्याला दिसते. आतले खोबरे कोणी नेले, ते नासले, तरी त्याच्या ध्यानातच येत नाही. तो फक्त त्या नरोटीची उपासना करीत असतो. पण त्याची श्रद्धा मात्र अशी असते की आपण श्रीफळाचीच उपासना करीत आहो. समाजाचा अधःपात तेथूनच सुरू होतो. धर्म, विद्या, नीती, राजकारण, समाजव्यवस्था या प्रत्येक क्षेत्रात जेव्हा जेव्हा बाह्य, जड रूपावर, केवळ कर्मठ आचारांवर, टिळेटोपी- गंधमाळांवर, यांत्रिक कसरतीवर समाज आपले लक्ष केंद्रित करतो त्या वेळी त्या त्या संस्थेचा ऱ्हास होऊ लागतो. आणि सर्वच क्षेत्रांत नरोटीची उपासना सुरू झाली की एकंदर समाज रसातळास जातो. मिर्झा राजे जयसिंग व त्यांचे समकालीन लक्षावधी, कोट्यवधी हिंदुलोक यांची धर्मश्रद्धा या प्रकारची होती. हिंदुधर्माचा व हिंदुसमाजाच्या धारणेचा, रक्षणाचा, स्वातंत्र्याचा, योगक्षेमाचा, संपन्नतेचा, अभ्युदयाचा काही संबंध आहे ही कत्पना त्यांच्या मनाला कधीही शिवली नव्हती. धारण, पोषण, रक्षण, समृद्धी, स्वातंत्र्य, अभ्युदय हे ज्याने साध्य होईल तो धर्म, याची जाणीव कित्येक शतकांपासून त्यांच्या मनातून लुप्त झाली होती.
 ब्रिटिशांचा राज्यविस्तार हिंदुस्थानात चालू होता. त्यावेळी 'गुप्ता' या नावाचे एक जैन पेढीवाल्यांचे घराणे त्यांना अखंड साह्य करीत असे. ते लोक ब्रिटिशांना सढळ हाताने द्रव्यसाहाय्य तर करीतच, पण त्याशिवाय येथील राजांचे कारभार, त्यांच्या लष्करी हालचाली, त्यांच्या मसलती, यांच्या गुप्त बातम्या हेरा-