पान:माझे चिंतन.pdf/२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरस्वतीची हेळसांड ११  

उन्मूलन करणे अवश्य आहे. हिंदुस्थान हे आपणांस एकराष्ट्र घडवावयाचे आहे. या तत्त्वावर सध्या असंख्य आक्षेप येत आहेत. तेव्हा राष्ट्रनिष्ठेची महती समाजाला पटविण्यासाठी वाङ्मयाचा वर्षाव केला पाहिजे. भांडवलशाही आहे या स्वरूपात टिकवून धरून कोणताच समाज टिकणार नाही. कामगारवर्गाचे हित हाच ध्रुवतारा कोणत्याही समाजाच्या अग्रणींनी पुढे ठेवला पाहिजे. या क्षेत्रात तर वर्गविग्रह, आंतरराष्ट्रवाद, विरोधविकासवाद इत्यादी अनेक तत्त्वे प्रचलित झाली आहेत. त्या सर्वांचा खोल अभ्यास करून पंडितांनी समाजाला मार्गदर्शन करणारे ग्रंथ लिहिणे अवश्य आहे. लोकसत्ता, संघसत्ता यांविषयी आपण बहुतेक सिद्धांत दत्तक घेऊन चाललो आहो. त्यांचाही शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. विज्ञानात आपण काही प्रगती करीत आहोत. विज्ञान मुलांना थोडे शिकवीत आहो, पण विज्ञाननिष्ठा निर्माण करण्याचे अल्पही प्रयत्न होत नाहीत. अशा रीतीने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण क्रांतिकारक विचार करीत असलो तरी क्रांतिकारक तत्त्वज्ञान प्रतिपादन करणाऱ्या वाङ्मयाची उणीव फार आहे. आणि ती भरून निघाली नाही तर समाजाची आपण जी नवी घडण करू तिला स्थैर्य येणार नाही.
 फार पूर्वीच्या काळी सरस्वतीच्या या सामर्थ्याचे महत्त्व पूर्वसूरींनी जाणले होते आणि महाभारतात समाजाच्या सर्व अंगोपांगांची तात्त्विक चर्चा अगदी विपुल प्रमाणात त्यांनी करून ठेवली होती. संस्कृत भाषेशी प्रत्यक्ष संबंध सुटल्यानंतर ज्या देशी भाषा निर्माण झाल्या त्यांनी महाभारतातील कथा व काही वेदान्ती प्रकरणे यांचाच फक्त प्रचार केला. समाजरचनेविषयी जे अत्यंत प्रगल्भ विचार त्यात सांगितलेले आढळतात त्याचा मागमूसही देशी वाङ्मयात दिसत नाही. त्या शतकातील पुरुषांना नवीन विचार सुचले, त्यांनी काही प्रमाणात ते प्रत्यक्षातही आणले; पण वाङ्मयाचा आश्रय करून त्यांनी ते चिरस्थायी करून ठेविले नाहीत. म्हणून नव्या काळाला अवश्य ते तत्त्वज्ञान, अवश्य तो नवा धर्म निर्माण झाला नाही व आपला अपकर्ष झाला. आजही आपण तोच प्रमाद करीत आहोत. सरस्वतीच्या सामर्थ्याचे महत्त्व आपण आकळिले आहे असे वाटत नाही. आणि यामुळे आपले सामाजिक पुनर्घटनेचे प्रयत्न तितकेसे यशस्वी होत नाहीत. म्हणून महाराष्ट्रीय पंडितांना माझी आग्रहाची विनंती अशी आहे की त्यांनी हे प्रचंड कार्य शिरावर घ्यावे आणि सामाजिक, राजकीय, धार्मिकय, आर्थिक पुनर्घटनेचे