पान:माझे चिंतन.pdf/२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १० माझे चिंतन

मार्ग, अद्वैतवेदांत यांविषयी ज्ञानेश्वरांनी ग्रंथ लिहिण्याची जी परंपरा घालून दिली ती आजतागायत चालू आहे. त्यामुळे परमार्थातले कर्म, पुनर्जन्म, आत्मा, मोक्ष, माया, सगुणनिर्गुण असले गहन विचारसुद्धा अगदी निरक्षर शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. ज्ञानेश्वरांनी गीतेवर नऊ हजार ओव्या लिहिल्या. पण त्या कमी वाटून दासोपंताने त्याच गीतेवर एक लक्ष ओव्या लिहिल्या. पण ' मराठा तेवढा मेळवावा ', ' यत्न तो देव जाणावा ', ' शक्तीने मिळती राज्ये ' या समर्थांच्या सिद्धान्तांचे विवेचन करण्यासाठी एक ओवीसुद्धा कोणी लिहिली नाही. जनमनावर एखादे तत्त्वज्ञान बिंबवावयाचे असले तर त्यासाठी केवढा विपुल ग्रंथसंभार निर्माण करावा लागतो हे मराठीतील परमार्थ- वाङ्मयाकडे पाहिले म्हणजे कळून येते. बाराव्या शतकापासून दर शतकात, पुढे तर दर दशकात आणि पुढे दरवर्षी या विषयीचे ग्रंथ निर्माण होऊ लागले. हजारो हरदास, कीर्तनकार, पुराणिक समाजावर त्याचे संस्कार करू लागले आणि त्याचाच परिणाम होऊन हा भारतीय समाज इहविन्मुख होऊन पराक्रमशून्य बनला. समर्थांनी भिन्न तत्त्वज्ञान निर्माण करण्याचा अल्पसा प्रयत्न केला. त्यामुळे महाराष्ट्रापुरती जागृती निर्माण झाली. पण समर्थांना कोणी दासोपंत न भेटल्यामुळे त्या निवृत्तीच्या ओघात त्यांचा खरा ' दासबोध ' लुप्त होऊन गेला.
 अलीकडच्या काळात मागल्यासारखी स्थिती नाही हे जरी खरे असले तरी जी सामाजिक, राजकीय, धार्मिक क्रांती व्हावयास पाहिजे आहे, तिच्या मानाने पाहता निर्माण झालेले वाङ्मय अगदी अल्प आहे. अस्पृश्यतानिवारण, मिश्रविवाह, पतितपरावर्तन, संसारप्रेम, कर्मयोग, चातुर्वर्ण्यनाश इत्यादी ज्या सुधारणा आवश्यक आहेत त्या आपण करीत चाललो आहोत. पण त्याचे सर्व प्रतिपादन केवळ मानव्याच्या, सहानुभूतीच्या, उदारतेच्या दृष्टीने होत आहे. आरंभी तसे व्हावे हे युक्तच आहे. कारण कोणत्याही सुधारणेची पहिली प्रेरणा सहृदयतेतूनच निर्माण होत असते; पण हे दीर्घकाल टिकणार नाही. दीर्घकाल रूढ असलेल्या आचारविचारांचे तत्त्वज्ञानपूर्वक निर्मूलन झाले नाही तर क्रांतिकारक सुधारणा या चिरस्थायी होत नाहीत. आणि त्या दृष्टीने विचार करता आपल्या सामाजिक पुनर्घटनेचे तत्त्वज्ञान शास्त्रीय दृष्टीने लिहिले गेलेच नाही असे म्हणावे लागते.
 जीवशास्त्र, वंशशास्त्र यांचा जगातल्या पंडितांनी अपरिमित अभ्यास केला आहे. तो विचारात घेऊन आपल्या जातिसंस्थेचे व चातुर्वर्ण्याचे तत्त्वज्ञानपूर्वक