पान:माझे चिंतन.pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरस्वतीची हेळसांड  

लागली असती. आणि दर शतकात, दर प्रांतात हेच होऊन प्रत्येकाचे ज्ञान वातावरणात विरून गेले असते आणि मग त्यातून राजकीय किंवा धार्मिक असे कोणतेच तत्त्वज्ञान निर्माण होणे शक्य झाले नसते.
 महाराष्ट्रात व भरतखंडात नेमके हेच झाले. ऐहिक क्षेत्रात जे विचार त्याच काळी पाश्चात्त्यांच्या चित्तांत स्फुरत होते ते येथील लोकांच्या मनात आलेच नसतील हे अशक्य आहे. मराठेशाहीत तर असे विचार उसळत होते याविषयी वाटेल तितके पुरावे उपलब्ध आहेत. शिवछत्रपती आणि समर्थ यांनी तर ते अमलात आणण्याचा प्रयत्नही केला होता. बाजीरावाच्या मनात मस्तानीला हिंदू करून घेऊन तिच्या मुलाची मुंज करावयाची होती. माधवरावांच्या वेळी सैन्यातली अस्पृश्यता नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आणि ' राज्य हे कोणाच्या मालकीने नसून आपण केवळ त्याचे संरक्षक आहो, ' हा महनीय सिद्धान्त त्यांनी सांगितला होता. रामशास्त्री, परशुरामभाऊ यांचे विधवाविवाह चालू करण्याविषयीचे प्रयत्न प्रसिद्धच आहेत. पण या तऱ्हेचे हे क्रांतिकारक विचार सरस्वतीच्या कृपेच्या अभावी वातावरणात विरून गेले; त्यांचे तत्त्वज्ञानात रूपांतर झाले नाही. त्याचे कोणी शास्त्र केले नाही. स्वतः या पंडितांनी किंवा त्यांच्या आसपासच्या लोकांनी हे विचार ग्रंथबद्ध करण्याचा प्रयत्न केला असता तर, दर दशकास एकात दुसऱ्याची भर पडून या क्रांतिकारक विचारांचा एक बलशाली प्रवाह निर्माण झाला असता आणि मग त्याच्या ओघात जुने घातकी विचार वाहून गेले असते; पण हे घडले नाही. म्हणूनच शिवकालानंतरच्या मराठेशाहीला जडशक्तींच्या संघर्षाचे स्वरूप आले.
 समाज जगण्यास कोणाच्यातरी एका निष्ठेची आवश्यकता असते. उत्तर मराठेशाहीत या तऱ्हेची प्रबल, बहुजनमान्य अशी निष्ठा कोणतीच नव्हती. इंग्रज हा इंग्रजाविरुद्ध लढणार नाही, फ्रेंच हा फ्रेंचाविरुद्ध लढणार नाही अशी निष्ठा युरोपात ठरून गेली होती. पण येथे हिंदू हिंदूविरुद्ध, मराठा मराठ्याविरुद्ध, भोसल्यांचे सेवक भोसल्यांच्या सेवकांविरुद्ध सारखे लढत होते. दृढ अशी कोणाचीच निष्ठा नव्हती, आणि याचे कारण म्हणजे राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक तत्त्वज्ञानाचा अभाव हे होय.
 कोणत्याही क्षेत्रात पंडितांनी आपले विचार ग्रंथबद्ध केले तर त्याचा प्रभाव केवढा पडतो याचे उदाहरण महाराष्ट्राच्या इतिहासातच सापडते. परमार्थ, भक्ति-