पान:माझे चिंतन.pdf/२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  माझे चिंतन

त्यांच्यांत बुद्धिमान कोण, शूर कोण, -सर्व तपशील अनेकांनी लिहिला आहे. आणि त्यामुळेच नवीन आलेल्यांना या भूमीचे आकलन करणे फार सुलभ होत असे. गुरुत्वाकर्षण पहिल्यापासून शोधावे हा प्रसंग त्यांच्यावर येत नसे !
 राष्ट्रात जे विचारी व कर्ते पुरुष निर्माण होतात त्यांच्या विचारांचे व कर्तृत्वाचे धन ग्रंथबद्ध झाले की पुढील पिढीवर त्याचे संस्कार होतात व त्या पिढीत कर्ती माणसे निर्माण होतात. त्यांचे तत्त्वज्ञान पुन्हा ग्रंथबद्ध झाले की, ते पुढील पिढीस उपयोगी पडते. आणि अशा रीतीने राष्ट्राचे ज्ञानधन वाढत जाऊन त्यातून अनेक प्रकारची शास्त्रे निर्माण होऊन समाज बलशाली होतो. बाराव्या तेराव्या शतकापासून युरोपात नेमका हाच प्रकार सुरू झाला. आठदहा शतके अंधारात घोरत पडलेला हा भूभाग या वेळी जागा झाला आणि विचार करू लागला. पोपचे अधिकार किती, राजाचे किती, ग्रंथप्रामाण्य काय म्हणून मानावे, धर्माचा अंतिम हेतू काय, जीवनात आनंद भोगण्याचा मानवाला हक्क आहे की नाही, बायबलातील पापाची मीमांसा खरी आहे काय, पारलौकिकाचा ऐहिकावर पगडा किती असावा, हे व या तऱ्हेचे अनंत प्रश्न लोकांच्या मनात उद्भवू लागले. आपल्याकडे हे उद्भवले नसतील, हे शक्य नाही. पण युरोपच्या पंडितांनी व कर्त्या पुरुषांनी सरस्वतीचे सामर्थ्य ओळखून दरवेळी आपले विचार ग्रंथबद्ध करून ठेवले व ज्ञानधन वाढवीत नेले, आणि येथीलांनी ते केले नाही हा मुख्य फरक आहे. मार्सिग्लियो, विल्यम ऑफ ओकॅम, जॉन हस्, वायक्लिफ, पेट्रार्क, लूथर, इरॅस्मस अशा किती तरी ग्रंथकारांनी पुढील पिढ्यांना शिकवण्याचे कार्य अव्याहत चालू ठेविले होते. तेराव्या शतकापासून युरोपचा जो उत्कर्ष झाला त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सरस्वतीच्या साह्याने अमर करून ठेविलेले हे विचार, हे तत्त्वज्ञान, हे आहे. युरोपात बुद्धिवादाचा उदय झाला. ग्रंथप्रामाण्यवादी धर्मोपदेशकांचे वर्चस्व नष्ट झाले, राष्ट्रनिष्ठा ही प्रबळ शक्ती उदयास आली आणि विज्ञान वाढीस लागून पुढे औद्योगिक क्रांती घडून आली. यांपैकी कोणतीही घटना हे एका व्यक्तीचे कार्य नाही. शेकडो पंडित, तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ यांचे ते कार्य आहे, आणि या पंडितांचे हे कार्य चारपाच शतके चालू होते व अजूनही चालू आहे. पण या पंडितांनी आपले विचार लिहून ठेवले नसते तर हे कार्य घडून आले नसते. तेराव्या शतकातील पंडितांच्या तत्त्वज्ञानाचा पत्ता चौदाव्या शतकातील पंडितांना लागला नसता. त्यांना पुन्हा पायापासूनच सुरुवात करावी