पान:माझे चिंतन.pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरस्वतीची हेळसांड  

त्यांच्याबरोबरच लुप्त झाले. थोर पुरुष विद्यमान असतात तोपर्यंत त्यांची वाणी व कृती यांवरून त्यांचे तत्त्वज्ञान लोकांत पसरत असते. पण त्यांचे विचार, त्यांची शिकवण ग्रंथनिविष्ट झाली नाही, तर पुढील पिढीस त्यांचे दर्शन घडत नाही. मराठी राजसंस्थापकांची हीच स्थिती झाली. त्यांच्या दिव्य दृष्टीचे, क्रांतिकारक विचारांचे आकलन तत्कालीन पंडितवर्गाला झाले नाही. आणि या त्यांच्या प्रज्ञाहीनतेमुळे पुढील पिढ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे.
 समर्थांच्या समकालीन शिष्यांनी व भक्तांनी त्यांच्याविषयी व त्यांचा ग्रंथ जो दासबोध त्याविषयी अनेक स्तोत्रे, आरत्या, धावे करून ठेवले आहेत. हे सर्व वाचले म्हणजे मनाला मोठा उद्वेग वाटतो. समर्थांच्या वाङ्मयात बाराशे पृष्ठांपैकी राष्ट्रीय तत्त्वज्ञानाला अवघी सत्तर-ऐंशी पृष्ठे दिली आहेत, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होय, असे जे वर पुनःपुन्हा म्हटले आहे, त्याचे कारण त्यांच्याविषयी त्यांच्या शिष्यांनी केलेल्या आरत्या वाचल्या म्हणजे चांगले कळून येते. या शिष्यकृत सर्व वाङ्मयात समर्थांच्या राष्ट्रीय कार्याचा चुकून सुद्धा कोठे उल्लेख केलेला नाही. भवडोहातून तारले, चौऱ्यायशीचा फेरा चुकविला, जन्ममृत्यू दूर केले, अज्ञानजडजीवां मार्ग सुकर केला, नवविधा भक्ती विशद करून सांगितली, त्यामुळे बद्ध हे सिद्ध झाले, भक्तांचा उद्धार झाला, शांती, क्षमा, विरक्ती, वैराग्य, भक्ती, ज्ञान यांचा प्रसार झाला, यांविषयीच सर्व कौतुक आहे. त्यांनी संघटना घडविली, क्षात्रधर्माचे उद्दीपन केले, संसाराची महती सांगितली, राष्ट्रधर्म शिकविला, याचा एका अक्षरानेही कोणी निर्देश केलेला नाही. त्यांच्या शिष्यांनाच समर्थांच्या कार्याचे स्वरूप कितपत कळले होते हे यावरून दिसून येते ! ही शिष्यांची कथा ! मग त्यानंतरच्या भक्तांची गोष्ट कशाला ! समर्थांची शिकवण इतर संतांच्यापेक्षा निराळी होती, जुन्या रूढ परंपरा उच्छिन्न करून लोकमताचा ओघ बदलून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ते क्रांतिकारक होते असे आज जरी कोणी प्रतिपादन केले तरी त्यावर त्यांचे भक्त आजही अगदी उसळून उठतात. इतर संत व समर्थ यांच्यात फरक केलेला त्यांना मुळीच खपत नाही. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांच्या प्रसाराहून त्यांचे कार्य निराळे होते हे म्हणणे त्यांना सहन होत नाही, इतके समर्थांच्या कार्याचे त्यांना आकलन झाले आहे !
 जी गोष्ट समर्थांची तीच शिवछत्रपतींची. त्यांनी ज्या वेळी राज्यव्यवहार-कोश करण्याची आज्ञा दिली, त्या वेळी भाषेच्या शुद्धतेची महती सांगितली असलीच