पान:माझे चिंतन.pdf/१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ६ माझे चिंतन

पाहिजे. पतितांची शुद्धी करण्याची चाल सुरू केली, त्यावेळी तिची कारणमीमांसा केली असलीच पाहिजे. ' कलावाद्यन्तयोः स्थितिः । ' या मूर्ख विचारसरणीचा उच्छेद करून ' मी क्षत्रिय आहे ' असे सांगून स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला, त्यावेळी श्रीकृष्णाप्रमाणेच त्यांनी धर्माधर्माविषयी विवेचन केले असलेच पाहिजे. पण श्रीकृष्णाच्या मुखीचे अमृतबिंदू जसेच्या तसे संग्रहीत करून सरस्वतीच्या साह्याने ते अमर करून ठेवणारे वेदव्यास भारतकाळी होते तसे शिवछत्रपतींच्या तत्त्वज्ञानाला अमररूप देणारे पंडित त्यांच्या काळी झाले नाहीत, हे दुर्दैव होय. त्यामुळे त्यांनी अंगीकारलेले क्रांतिकारक तत्त्वज्ञान एका पिढीतच लुप्त होऊन गेले व पुढील काळात जड बाहुबल तेवढे उरले.
 शिवसमर्थांचे तत्त्वज्ञान, त्यांची शिकवण, त्यांचा नवा धर्म हा ग्रंथनिविष्ट झाला नाही ही जी दुर्दैवी घटना ती मुद्दाम विस्ताराने वर्णन करून सांगण्याचे कारण असे की ती घटना एकाकी नसून हिंदुस्थानाच्या गेल्या एक हजार वर्षांच्या इतिहासाचे ते एक लक्षणच आहे. मला मुख्यतः हे सांगावयाचे आहे की, या दीर्घ कालखंडात या भूमीत पित्याने पुत्राला सरस्वतीच्या साह्याने शिकविलेच नाही. या कालात, या भूमीत ऐहिक क्षेत्रात अनेक कर्ते राजे झाले, सेनापती झाले, मुत्सद्दी झाले, तत्त्ववेत्ते झाले, राजनीतिज्ञ झाले; पण त्यांतल्या कोणीही आपली शिकवण ग्रंथरूपाने पुढील पिढीस दिली नाही. त्यांनी स्वतः तसे केले नाही; आणि त्यांच्या शिष्यांनी भक्तांनी किंवा समाजातील इतर पंडितांनीही ही काळजी घेतली नाही आणि त्यामुळे येथे ज्ञानाचा संचय झाला नाही. दर पिढीला पुन्हा श्रीगणेशा पासून प्रारंभ. श्रीमंत थोरले बाजीराव यांनी ज्या अनेक लढाया मारल्या त्यांची आज जी थोडीशी वर्णने आपण वाचतो त्यांवरून युद्धविषयक कितीतरी सिद्धांत त्यांच्या मनात निश्चित झाल्याचे दिसून येते. निजामाशी त्यांनी ज्या लढाया केल्या त्यांवरून आपल्याला हवे त्या ठिकाणी शत्रूला आणून तेथे त्याचा निःपात करण्याचे नेपोलियनचे हुकमी कसब त्यांच्या ठायी होते असे दिसून येते. पण याचे विवेचन करून त्यावरून सिद्धांत बांधून त्याचे युद्धशास्त्र करून सांगणारा कोणीही रणविशारद येथे झाला नाही आणि त्यामुळे पुढच्या सेनापतीला स्वतःचे युद्धशास्त्र प्रारंभापासून तयार करावे लागले. आणि ही कहाणी प्रत्येक क्षेत्रातल्या कर्त्या पुरुषाची आहे. प्रत्येकाचे विचार, त्याने मनात बांधलेले सिद्धांत त्याच्याबरोबर लुप्त होऊन जात. आणि त्याच्या पुढील पिढीला पायापासून प्रारंभ करावा लागे;