पान:माझे चिंतन.pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ४ माझे चिंतन

आहे. समाजाचे बल हे त्यांतील धार्मिक संस्था, सामाजिक रूढी, अर्थव्यवस्था, राजकीय तत्त्वज्ञान, म्हणजे एकंदर त्याची संस्कृती यावर अवलंबून असते. केवळ तलवारीत ते बळ नसते. ते तलवारीच्या मागच्या तत्त्वज्ञानात असते. ते तत्त्वज्ञान उंच करावे, सामाजिक, धार्मिक संस्थांतील दोष नाहीसे करून, नव्या रूढी प्रसृत कराव्या, आणि विघटनेची बीजे नाहीशी करून समाज संघटित करावा असा विचारपूर्वक केलेला प्रयत्न पहिल्या कालखंडात दिसून येतो. दुसऱ्या कालखंडात असा प्रयत्न मुळीच दिसत नाही.
 शिवछत्रपती हे केवळ राज्यकर्ते, सेनापती किंवा मुत्सद्दी होते असे नाही. ते एक थोर तत्त्ववेत्तेही होते, ते राजर्षी होते. धर्म, अर्थ, समाजरचना या क्षेत्रांत पुनर्घटना करण्याचे त्यांचे जे प्रयत्न झालेले दिसतात त्यांवरून हे स्पष्ट दिसून येते. परकीय शत्रू हा खरा शत्रू नव्हे तर नव्या काळाला प्रतिरोध करणारी जुनी समाजव्यवस्था, जुन्या धर्मकल्पना, जुनी अर्थव्यवस्था म्हणजे जुने तत्त्वज्ञान हा खरा शत्रू होय हे त्यांनी जाणले होते. आणि म्हणूनच पतितांची शुद्धी, भाषाशुद्धी, समुद्रगमन, वतन-व्यवस्थेचा उच्छेद, क्षत्रियत्वाची स्थापना इत्यादी नवी तत्त्वे त्यांनी रूढ केली व आचरली. मराठेशाहीच्या पुढील काळात समाजाच्या जडदेहधारी शत्रूवरच फक्त लक्ष होते असे दिसते. प्रगतीला विरोध करणारी जुनी संस्कृती या शत्रूकडे कोणाचेच लक्ष नव्हते.

याची जबाबदारी पंडितांवर

 पण या वैगुण्याची, या अवनतीची बरीचशी जबाबदारी शिवाजी व समर्थ यांच्या काळच्या पंडितांवर आहे. त्या दोन महापुरुषांनी निर्माण केलेल्या नव्या परंपरा, त्यांचे क्रांतिकारक विचार, त्यांचे नवे धोरण, त्यांची काल भेदून मागेपुढे पाहणारी दृष्टी, यांचे विवेचन करणारे विपुल ग्रंथ या पंडितांनी लिहून ठेवले असते, तर पुढील काळात आलेली दुर्दशा टळली असती. ते ग्रंथ हाती घेऊन पुढीलांनी मार्ग आखले असते आणि त्यांच्या आधारानेच कालाच्या धावत्या ओघाला अनुसरून दर वेळी नवे तत्त्वज्ञान, नवे धर्मबंध त्यांनी निर्माण केले असते. कालाला कलाटणी देणारे शिवसमर्थांसारखे पुरुष काही दर शतकात होत नसतात. पण सरस्वतीच्या साह्याने त्यांना अमर करणे मात्र शक्य असते. त्यांच्या काळच्या पंडितांनी हे केले नाही. त्यामुळे शिवछत्रपतींचे व समर्थांचे तत्त्वज्ञान