पान:माझे चिंतन.pdf/१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरस्वतीची हेळसांड  

इतिहासप्रसिद्धच आहे. पण वाणीने त्यांनी जन्मभर जे विवेचन केले ते सर्व ग्रंथनिविष्ट झाले नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ग्रंथनिविष्ट जे वाङ्मय आहे त्याचा सर्व भर परमार्थविचारांवर आहे. नवे तत्त्वज्ञान त्यात अगदी थोडे आहे. आणि तेही फुटकळ विचारांच्या रूपाने आलेले आहे. या प्रकरणांतून, अशी काही वाक्ये जमवून त्यांच्या आधाराने समर्थांच्या राजकीय तत्त्वज्ञानाची उभारणी करावी लागते. महंतांचे कार्य, शक्तीची उपासना, प्रपंचाचे महत्त्व, राजकारण अशा काही विषयांवर सबंध समास किंवा प्रकरण फार तर खर्ची पडलेले दिसते. इतर विषयांवर तेही नाही. ' संभाजीस पत्र ', ' आनंदवनभुवन ' इत्यादी प्रकरणांत मधूनच त्याविषयी आलेल्या वचनांवरून समर्थांच्या विचारांचा अदमास बांधावा लागतो. आणि हे सर्व जरी एकत्र केले तरी वर सांगितल्याप्रमाणे एकंदर हजार बाराशे पृष्ठांपैकी फार तर साठ-सत्तर, अगदी पराकाष्ठा म्हणजे ऐंशी, पृष्ठे भरतील. म्हणजे समर्थांचे जे खरे कार्य त्याला त्यांच्या वाङ्मयात अगदी गौण, अल्प असे स्थान मिळालेले आहे. आणि पूर्वीच्या संतमंडळींनी जे परमार्थ-विचार, जो वेदान्त, जो भक्तिमार्ग, जो निवृत्तिमार्ग उपदेशिला त्याच्या विवेचनासाठी, प्रतिपादनासाठी समर्थांचे बहुतेक वाङ्मय खर्ची पडले आहे.

तत्त्वज्ञान ग्रंथवद्ध झाले नाही.

 याचा अर्थ असा होतो की समर्थांनी राजकीय क्षेत्रात जे महान कार्य केले, ज्या चळवळी सुरू केल्या, स्वराज्य संस्थापनेसाठी जी वैचारिक क्रांती केली, जे नवे तत्त्वज्ञान प्रसृत केले ते, खरे पाहता, ग्रंथबद्ध झालेच नाही. जे काही थोडेबहुत झाले ते परमार्थ-विचार-महोदधीत इतके विरून गेले की त्यांच्या वेळच्या पिढीसही त्याची जाणीव राहिली नाही. आणि हीच महाराष्ट्राच्या व भरतखंडाच्या इतिहासातील मोठी दुर्दैवी घटना होय असे मला वाटते.
 मराठ्यांच्या इतिहासातील शिव-समर्थांचा काल व पुढील काल याची तुलना केली तर त्या दोहोंत एक फार महत्त्वाचा फरक दृष्टीस पडतो. पहिल्या कालखंडात परकीय आक्रमणाशी झुंज दिलेली आढळते, त्याचप्रमाणे हिंदू समाजव्यवस्थेत जे दोष आढळतील ते नष्ट करून, त्या समाजाच्या अनेक शतकांच्या दौर्बल्याची कारणे नाहीशी करून त्याची पुनर्घटना करण्याचे प्रयत्न झालेले दिसतात. पुढील काळात नुसता पराक्रम दिसतो. लढाया, स्वाऱ्या, मोहिमा यांचाच तो इतिहास