पान:माझे चिंतन.pdf/१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 २ माझे चिंतन

मिळतात, नामस्मरणाने मिळत नसतात, ही शिकवण दिली. शत्रु मित्र सर्व सारखे, हे बुळगे तत्त्वज्ञान नष्ट करून, प्रखर आपपरभाव त्यांनी निर्माण केला. सदैव कटावर कर ठेवून अठ्ठावीस युगे निष्क्रियपणे उभा राहणारा विठोबा दूर सारून त्या जागी धनुर्धर, परंतप अशा रामाची उपासना रूढ केली. हातात वारकऱ्याची पताका न घेता 'शर्थीची तलवार करावी' असा उपदेश केला. दैववादाने हतबल, निःसत्त्व, हीनदीन झालेल्या लोकांना, ' यत्न तो देव जाणावा ' हा मंत्र दिला. आणि ही सर्व विद्या लोकांमध्ये हळूहळू पेरण्यासाठी अनेक शिष्य निर्माण करून नेणत्या लोकांना जाणते करून ' महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे ' हे स्वप्न खरे करून दाखविले.
 समर्थांची ही जी नवी शिकवण, त्यांचे हे जे क्रांतिकारक तत्त्वज्ञान त्याचे सम्यक् आकलन व्हावे म्हणून आपण त्यांचे वाङ्मय पाहू लागलो तर एक मोठी विस्मयजनक गोष्ट ध्यानात येते. ती ही की, समर्थांच्या समग्र ग्रंथांत या तत्त्वज्ञानाचे सविस्तर सांगोपांग असे विवेचन कोठेही केलेले नाही. समर्थांचे दासबोध, रामायण, अष्टके इत्यादी समग्र ग्रंथ एकत्र केले तर सुमारे बाराशे पृष्ठे भरतील. यांपैकी या नव्या तत्त्वज्ञानाला अवघी बारा पृष्ठे दिलेली आहेत. आणि ती वाचून पाहिली तरी त्यात या तत्त्वज्ञानातील संघटना, प्रयत्नवाद, ऐहिकाची आवश्यकता, तर्काची श्रेष्ठता, महाराष्ट्रधर्म, शत्रु मित्रभाव या तत्त्वांचे साकल्याने विवेचन कोठेच आढळत नाही. दासबोधात किंवा अन्यत्र नवविधा भक्ती, आधिभौतिक ताप, बद्धलक्षण, मोक्ष, माया, पुरुषप्रकृती, रजोगुण, तमोगुण इत्यादी परमार्थातील तत्त्वांचे आणि सिद्धांताचे जे विवरण आहे ते अगदी सविस्तर आहे. मूल सिद्धांताचे विवरण, त्यावर येणाऱ्या शंका, आक्षेप यांचे निरसन व खंडन, स्वमताचे पुन्हा मंडन, त्याला आधार, प्रमाण, त्याची अनेकवार पुनरुक्ती; हे सर्व प्रकार या परमार्थविषयाच्या विवेचनात आढळतात. तसा विषयाचा प्रपंच या नवविचारांच्या बाबतीत थोडे अपवाद सोडले तर कोठेही आढळत नाही. संघटना, प्रयत्नवाद, तर्कनिष्ठा ही तत्त्वे अशी आहेत की समाजाला त्यांचे पूर्ण आकलन व्हावयास हवे असेल तर त्या प्रत्येकावर एकेक दासबोध लिहिणे आवश्यक आहे. आणि जेव्हा जनमताचा ओघ विरुद्ध दिशेला वाहात असेल तेव्हा त्याला वळवून आणण्यासाठी तर याहीपेक्षा मोठा प्रयत्न अवश्य आहे. समर्थांनी जनमताचा ओघ आपल्या वाणीने व प्रत्यक्ष कृतीने वळविला ही गोष्ट