पान:माझे चिंतन.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १४२ माझे चिंतन

चुकल्यामुळे मुलांचे उत्तर चुकते; पण त्याची विद्यार्थ्यांना लाज वाटत नाही. हा आपल्या बुद्धीचा दोष नसून हे केवळ दुर्लक्षामुळे झाले, असे समाधान ते करून घेतात. निबंध लिहिताना स्पेलिंग चुकले आणि शिक्षकांनी हटकले तर, स्पेलिंग माहीत होते पण चुकून तसे लिहिले गेले असे उत्तर ते देतात. म्हणजे या दुर्लक्षाच्या चुका खंत बाळगण्याजोग्या आहेत असे त्यांना वाटत नाही. आणि हीच वृत्ती घेऊन ते जीवनाच्या आखाड्यात उतरतात. (Boys carry these mistakes into life.) आणि तेथेही तशीच भोंगळ सृष्टी निर्माण करतात.
 विद्यार्थ्यांच्या पेपरातल्या सृष्टीच्याच प्रतिकृती सध्या आपल्याला प्रत्येक खात्याच्या कारभारात दृष्टीस पडत आहेत. सरकारी कचेरीच्या कोणत्याही खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुलाखत घ्या. त्यांची सारखी तक्रार असते की, चूक न करता मजकूर टाइप करणारा, गोंधळ न करता हिशेब करणारा, हवी ती माहिती बिनचूक काढून आणणारा एकसुद्धा कारकून सापडत नाही. बी. ए. झालेल्या दोन मुलींनी बेळगाव व कानपूर कोठेशी आहेत ही माहिती आपल्या वरिष्ठांकडे जाऊन अगदी 'बालभावाने' विचारलेली आहे !
 सध्याचे युग विमानाचे आहे; पण आपण बैलगाडीच्या युगात आहो. सूक्ष्मतम अणूंचेही पृथक्करण करण्याचे व त्यातून मारक हत्यारे निर्माण करण्याचे हे युग आहे, पण आपण अजून धोंडे, झाडे या हत्यारांच्या संगतीत राहून डार्विनचा सिद्धान्त खरा करण्याच्या नादात आहो.
 विद्यार्थ्यांच्या अंगी जे दोष आहेत म्हणून वर सांगितले त्याला ते स्वतःच सर्वस्वी जबाबदार आहेत असे मला मुळीच म्हणावयाचे नाही; पण मला विद्यार्थ्यांना असे सांगावयाचे आहे की, त्यांनी हा न्याय-अन्याय आता पाहात बसू नये. सध्याच्या शिक्षण-पद्धतीइतकी टाकाऊ, अधोगामी व शिक्षण- शास्त्राच्या नावाखाली रानटीपणाचे प्रदर्शन करणारी दुसरी कोणतीही शिक्षण पद्धती नसेल. पण ती आणखी एक शतकभर सुधारेल असे मला वाटत नाही. तेव्हा स्वतः विद्यार्थ्यांनीच कर्तृत्वाचा अभ्यास करून चौथ्या दशांशापर्यंतच्या चुकीचीही मोजदाद घेण्याची वृत्ती आपल्याठायी निर्माण करावी. समाजातील गोंधळाची जबाबदारी आपल्यावर नाही, असली अलिप्तवृत्ती ठेवू नये. कारण एस्. एस्. सी बोर्डात किंवा अन्यत्र जो गोंधळ होत आहे तो एका माणसाला निर्माण करता येणार नाही. एक माणूस कितीही श्रेष्ठ असला तरी तो जसे एकट्याच्या बळाने