पान:माझे चिंतन.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चौथ्या दशांशाची दक्षता ! १४३ 

सर्व राष्ट्र वर घेऊ शकत नाही; त्याचप्रमाणे एक माणूस कितीही नालायक असला तरी तो सर्व समाज अधोगामी करू शकत नाही. तेव्हा आजच्या गोंधळाल आपण जबाबदार नसलो तरी पाच वर्षांनी जो गोंधळ होणार आहे तो टाळण्याची जबाबदारी मात्र आपणांवर आहे, हे विद्यार्थ्यांनी विसरू नये.
 सध्याची महायुद्धे कशी होतात इकडे लक्ष देणे अवश्य आहे. वीस-वीस लक्षांची सेना हजार मैलांच्या आघाडीवर पसरून तिचे संचलन यंत्रासारखे घडवून आणणे या जातीच्या कर्तबगारीची तेथे आवश्यकता असते. एवढ्यांचे अन्न वेळेवर पुरविणे, एवढ्यांना कपडे, तंबू, शस्त्रास्त्रे इत्यादी अवजारे पुरविणे, बातम्या ठेवणे, रुग्णांची व्यवस्था करणे ही कामे इतकी अवाढव्य आहेत की, शाळा- कॉलेजातून चौथ्या दशांशाची दक्षता घेण्यास मुलामुलींना जेथे शिकवीत नाहीत तेथे ती पेलणे कधीच शक्य नाही. सध्याची आपली बोजड मुसळी वृत्ती पाहिली म्हणजे एवढ्यांच्या मलमूत्राची व्यवस्था सुद्धा आपल्याला जमेल असे वाटत नाही आणि औरंगजेबाच्या सैन्यांप्रमाणे आपली सैन्ये रोगराईनेच निम्म्याच्या वर मृत्युमुखी पडतील.
 युद्धाचे उदाहरण दिले, कारण नजीकच्या भविष्यकाळात आपल्याला घनघोर युद्धे करावी लागतील यात शंकाच नाही. त्या वेळी अध्यात्मबलाने जय मिळेल असा भ्रम कोणी बाळगू नये. सुदैवाने आपल्या सध्याच्या सरकारचेही तेच मत आहे. पण बरेचसे अध्यात्मवादी सज्जन अजून तो भ्रम पसरविण्याचे बंद करीत नाहीत म्हणून धोका वाटतो. तेव्हा महात्माजींनी स्वातंत्र्य खरे कोणत्या शक्तीने मिळविले याची वर केलेली मीमांसा ध्यानी घेऊन नव्या पिढीने प्रथम स्वतःला अध्यात्माच्या आणि आत्मबलाच्या मायामोहांतून सोडवून घ्यावे आणि सावधता, दक्षता, कुशाग्रता, कार्यकुशलता, तंत्रज्ञान, कारस्थानी वृत्ती या गुणांची वाढ करून कर्तृत्वाची म्हणजेच सामर्थ्याची जोपासना करावी. नाहीतर जर्मनीसारख्या एखाद्या महासामर्थ्यसंपन्न राष्ट्राशी कधी काळी आपली गाठ पडली तर फ्रान्स- जर्मनीत झालेल्या सेडानच्या युद्धातल्याप्रमाणे आपल्याही रणांगणाला रणांगणाचे रूप न राहता कत्तलखान्याचे रूप येईल !

नोव्हेंबर १९४९