पान:माझे चिंतन.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १४० माझे चिंतन

आले नाही, त्यांचा कधी कोठे गोंधळ झाला नाही याचे कारण भवानीची कृपा किंवा राज्यात चालणारा रामनामसप्ताह हे नसून कल्पनेचा व्याप, सावधता, दक्षता, कार्यकुशलता या गुणांची उपासना हे आहे.
 पण हे सर्व सांगत असताना मला पुनःपुन्हा एक गोष्ट सांगावयाची आहे ती ही की, सध्या आपल्या समाजातील भिन्नभिन्न संस्थांत जी नालायकी, नादानी व कर्तृत्वशून्यता दिसून येते ती त्या त्या संस्थांपुरती किंवा तेथल्या अधिकाऱ्यांपुरतीच आहे अशा भ्रमात आपण राहणे धोक्याचे आहे. या संस्था म्हणजे सर्व समाजापुढे ठेवलेले आरसे आहेत. त्यात आपलेच प्रतिबिंब आहे हे सर्व समाजाने व विशेषतः सुशिक्षित बुद्धिजीवी मध्यमवर्गाने ध्यानात घेतले पाहिजे. या वर्गाचे आम्ही लोक नावाला फक्त सुशिक्षित आहोत. मनाने, बुद्धीने व म्हणूनच कर्तृत्वाने आम्ही जुन्या, भोळसट, भाबड्या व भोंगळ युगातच असतो. शाळा कॉलेजात आम्हाला भूमिती, व्याकरण, विज्ञान इत्यादी अर्वाचीन विषय शिकवितात, पण त्यापैकी एकाचेही संस्कार आमच्या मनावर झालेले नसतात. आमच्या शाळा- कॉलेजांतील विद्यार्थी हे खेड्यातील मारुतीसारखे स्वयंभू, गोलसर व निराकार आहेत. नव्या युगाची छिन्नी त्यांच्यावर चाललेली नाही. नव्या युगाचे संस्कार होऊन त्यांना आकार आलेला नाही. नव्या शेंदराचे लेपाटे त्यांच्यावर बसतात, नाही असे नाही; पण आतले पहिले लेपाटे तसेच असतात. आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धीवर एक जाड कवच येऊन बसलेले असते.
 १८९४ साली लॉर्ड रॅले व सर विल्यम स्मिथ हे दोन शास्त्रज्ञ हवेच्या घटकांची मोजमापे घेत होते. त्याच त्याच मापाच्या ऑक्सिजन व नैट्रोजन या वायूंची त्यांनी अनेक वेळा वजने घेतली. ती अर्थातच जवळजवळ सारखी आली पण दरवेळी चौथ्या दशांशात फरक पडू लागला. पण एवढ्या सूक्ष्म फरकानेही त्यांना बेचैन करून सोडले. कारण ते शास्त्रज्ञ होते. नव्या युगातले होते. शेंदरी मारुती नव्हते. जास्त अभ्यास करता त्यांना आठवले की, १७७५ साली कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने वातावरणाच्या घटकांचे पृथक्करण करून अशीच वजने घेतली होती व ती नमूद करून ठेवताना या प्रक्रियेत मध्येच एक लहानसा बुडबुडा दिसतो असे त्याने लिहून ठेविले होते. यांना या चौथ्या दशांशातील चुकीने जसे अस्वस्थ केले होते त्याचप्रमाणे त्याला या बुडबुड्याने केले होते आणि याच धोरणाने जास्त संशोधन करताना त्यांना 'ऑरगॉन' या वातावरणाच्या