पान:माझे चिंतन.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चौथ्या दशांशाची दक्षता ! १३९ 

साठी आपण जी नवी व्यवस्था घडवीत आहो, ज्या आज्ञा देत आहो, जे कायदे करीत आहो, त्यांचा राष्ट्रीय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कोणता परिणाम होईल, त्याचे कल्पनाशक्तीने डोळ्यांपुढे पूर्ण चित्र उभे करणे व त्या सर्वांची आगाऊ पूर्ण व्यवस्था करणे हा कार्यक्षमतेचा पहिला गुण होय. पण आमच्या राज्यकारभारात त्याचा गंधही दृष्टीस पडत नाही. आज कायदा करावा आणि मग उद्या ध्यानात यावे की, अरे ! याला पाचशे अपवाद करणे आवश्यक आहे. कायदा करण्यापूर्वी अनुभवाने पुढील परिस्थिती आकळण्याची पात्रता आम्हांत नाही. कामगारांना वाटावयाच्या पैशाविषयी आज एक आज्ञा द्यावी व वाटण्याची वेळ आल्यावर त्यातल्या अनंत भानगडी ध्यानात येऊन आज्ञा फिरविण्याचा प्रसंग यावा ! या भानगडींची आम्हांला आगाऊ कल्पना येत नाही. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी वीसवीस वर्षे अनुभव घेतलेल्या अधिकाऱ्यांनी अगदी स्वतंत्र कमिट्या नेमून वेळापत्रके तयार करून कॉलेजवर लावून द्यावी आणि मग ध्यानी यावे की, अरे ! एका तासाला एकाच वर्गात दोन शिक्षक धाडणे युक्त नाही ! नियंत्रणे उठविण्यापूर्वी त्याचा परिणाम काय होईल हे आम्हांला कळत नाही; उठविल्यानंतर कळते. फितुरी होऊन नाश झाल्यावर मग फितुरीची कल्पना येते आणि कत्तली झाल्यावर अशा प्रसंगी कत्तली होतात हा बोध आम्हांला होतो. फाळणीच्या पूर्वी कत्तलीची कल्पना असती तर दहापाच लक्ष लोकांचे जीव वाचले असते असे अधिकाऱ्यांनीच मागून उद्गार काढले आहेत. पण परक्यांच्याबद्दल असा संशय घेणे आमच्या निरागस बालवृत्तीला शोभले नाही.
 कार्यक्षमता अंगी येण्यास कल्पनाशक्तीचे बळ किती मोठे असावे लागते ते पाहा. शिवछत्रपतींनी आपल्या सैन्यासाठी काढलेली काही आज्ञापत्रे आता उपलब्ध झाली आहेत, त्यावरून हा गुण म्हणजे काय याची कल्पना येईल. सैन्य ज्या वाटेने जाणार त्या वाटेला दुतर्फा शेतांतून उभी पिके आहेत; त्यांचा आपले शिपाई एखादे वेळी नाश करतील हे आगाऊ ध्यानी येऊन याविषयी आज्ञापत्रात सक्त ताकीद दिली आहे. घोड्यांची व्यवस्था काय, गवतांच्या गंजींची व्यवस्था कशी, हेही तपशीलवार सांगून ठेविलेले आहे. आणि रात्री छावणीत पणत्या लावतात, त्यातील वाती उंदीर नेतात व त्यामुळे पुष्कळ वेळा गवताच्या गंजी पेटून जनावरांना चारा राहात नाही म्हणून त्याविषयी अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी हेही सांगण्यास छत्रपती विसरले नाहीत. राजांना कोणत्याच कार्यात अपयश