पान:माझे चिंतन.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १३८ माझे चिंतन

अनिवार आसक्ती त्यांच्या ठायी निर्माण होते आणि जड सामर्थ्याचा, पाशवी बलाचा ते आश्रय करतात, हे दिसत असताना शतकानुशतके ज्यांनी स्वसामर्थ्याने सत्ता भोगली त्या ब्रिटिशांचा सत्ताभिलाष आपल्या अध्यात्मबलाने, आत्मक्लेशाने नष्ट झाला म्हणून त्यांनी आपणास स्वातंत्र्य दिले असे समजणे हे आपल्या बालभावाला शोभेसे असले तरी राष्ट्राला अत्यंत घातक आहे. सुभाषचंद्रांनी हिंदी सैन्यातूनच राष्ट्रीय सेना निर्माण केली आणि अशा रीतीने ब्रिटिश राज्याचा मुख्य आधार म्हणजे हिंदी सेनेची ब्रिटिशनिष्ठा तीच नष्ट केल्यामुळे, ब्रिटिशांचे कंबरडे मोडले हे ॲटली, क्रिप्स यांनीही बोलून दाखविले आहे. अर्थात यांच्यामागे काँग्रेसने निर्माण केलेली लोकजागृती, प्रतिकारशक्ती व राष्ट्रनिष्ठा नसती तर सुभाषचंद्रांना हे साधले नसते यात वादच नाही. म्हणून मुख्य श्रेय काँग्रेसला व महात्माजींनाच आहे. पण ते त्यांच्या आध्यात्मिक बलाला नाही, त्यांनी निर्माण केलेल्या शुद्ध भौतिक व बुद्धिगम्य सामर्थ्याला आहे.
 हे आग्रहाने सांगण्याचे कारण असे की, हे जर आपण एकदा नीट जाणले, आपण आध्यात्मिक बलाने, अहिंसेच्या सामर्थ्याने, आत्मिक प्रभावाने स्वातंत्र्य संपादिले नसून शुद्ध भौतिकबलाने ते संपादिले आहे आणि ब्रिटिशांच्या सारखे त्यातल्या त्यात विवेकी व शहाणा स्वार्थ जाणणारे राज्यकर्ते नसते तर यापुढले संग्राम इटली, रशिया, चीन यांच्याप्रमाणेच आपल्यालाही पाशवी बलानेच करावे लागले असते, हे जर आपण उमजलो तर भौतिक दृष्टीने विचार करून आपण राष्ट्रीय सामर्थ्याच्या सर्व अंगोपांगांची वाढ करण्याचा झटून प्रयत्न करू. पण तसे न करता अध्यात्मबलाच्या भ्रमातच आपण राहिलो तर आपल्या अंगी कार्यक्षमता येण्याची कधीच आशा नाही.
 कार्यक्षमता हे पाश्चात्त्य लोकांनी एक शास्त्र करून टाकले आहे आणि त्यांचे विजेचे शास्त्र, शेतीचे शास्त्र, अणूचे शास्त्र यांचे जर आपल्याला अनुकरण करता येते, तर या शास्त्राचे का येणार नाही ? पण सध्या आपले तिकडे लक्षच नाही. आपण कोठल्यातरी भ्रमात असल्यामुळे कर्तृत्वाची शास्त्रशुद्ध जोपासना करण्याचे प्रयत्नच आपण करीत नाही. इतकेच नव्हे तर आपण त्याचे महत्त्वही जाणलेले नाही.
 कर्तृत्वशास्त्राची रूपरेषा आपण अगदी वरवर जरी पाहिली तरी आपल्या त्या क्षेत्रातल्या दारिद्र्याची आपणास सहज कल्पना येईल. एखाद्या कार्याच्या सिद्धी-