पान:माझे चिंतन.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चौथ्या दशांशाची दक्षता ! १३७ 

आम्ही सोसलेल्या आत्मक्लेशामुळे आमच्या राज्यकर्त्यांच्या हृदयाचा पालट झाला, सत्याचा जय झाला, अहिंसा राजकारणात आली आणि अध्यात्मबलाने आम्हांला स्वातंत्र्य मिळाले असा उद्घोष ते करतात. आध्यात्मिक शक्तीच्या या वल्गना इतके दिवस जरी मधुर असल्या तरी आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दोन वर्षांतल्या घडामोडी पाहिल्यानंतर त्या एकदम बंद होणे अवश्य आहे हे जितक्या लवकर आपण जाणू तितका आपला उत्कर्ष जवळ येईल.
 आपण क्लेश सोसावे व दुसऱ्याचे मन जिंकावे, त्याचा हृदयपालट घडवावा, सत्याने असत्य जिंकावे, अध्यात्मबलाने भौतिक शक्तीला नामोहरम करावे असा महात्माजींचा प्रयत्न होता. गौतमबुद्ध, जीझस ख्राइस्ट यांचा असाच प्रयत्न होता आणि जगाच्या दुर्दैवाने गौतम- जीझसाप्रमाणेच महात्माजींचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे ही गोष्ट दुःखद खरी, पण ती झटकन आकलून आपण आपले धोरण आखले पाहिजे.
 येथले भांडवलदार, जमीनदार हे महात्माजींच्या सहवासात असत. महात्माजींचा त्यांच्यावर विश्वास असे. बिर्लासारख्यांच्या घरी ते उतरत. पण महात्माजींच्या दैवी, अध्यात्मबलाचा अणुमात्र तरी परिणाम त्यांच्यावर झाला आहे काय ? आपल्या निर्लोभवृत्तीने महात्माजींनी त्यांची लोभवृत्ती जिंकली आहे काय ? मुसलमानांचा हृदयपालट करण्यासाठी महात्माजींनी तीस वर्षे आत्मक्लेश सोसले, त्याचे फळ काय मिळाले हे सर्वश्रुतच आहे. हेही सोडून द्या. महात्माजींच्या सान्निध्यात त्यांचे भक्त म्हणून आजचे काँग्रेसमधील धुरीण गेली तीस वर्षे राहात होते. बहुतेक सर्व प्रांतांचा कारभार आज महात्माजींच्या या प्रमुख अनुयायांच्या हातीच आहे. या अनुयायांचा हृदयपालट किती झाला आहे, त्यांच्यावर महात्माजींच्या पवित्र सद्गुणांचा, सत्यअहिंसेचा किती संस्कार झाला आहे, त्यांच्या आध्यात्मिकतेची किती वाढ झाली आहे हे मद्रास, बिहार, पूर्व पंजाब, बंगाल, राजस्थान, विंध्य, मध्यभारत येथील मंत्रिमंडळांच्या चारित्र्यावरून स्पष्ट झाले आहे. एकनिष्ठ अनुयायांचा सत्तालोभसुद्धा महात्माजींच्या अध्यात्मबलाने जिंकला गेला नाही हे स्पष्ट दिसत असताना, ब्रिटिशांना आपण अध्यात्मबलाने जिंकले, महात्माजींची अहिंसा राजकारणात प्रभावी ठरली असा भ्रम आपण अजूनही कायम ठेवावयाचा काय ? सर्व हयात ज्यांनी महात्माजींच्या पुण्यमय सहवासात घालविली ते सत्ताधारी होताच पूर्वी नसलेला द्रव्यलोभ व सत्तेची