पान:माझे चिंतन.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १३६ माझे चिंतन

कार्यक्षमतेच्या घटकगुणांची हेळसांड होऊ लागली. सुदैवाने महात्माजींचे अध्यात्म जुन्या काळच्यासारखे नव्हते. त्यांत ऐहिकाचा तिटकारा नव्हता. समाजाच्या उत्कर्षाविषयी उदासीनता नव्हती, राष्ट्रीय आकांक्षांबद्दल पराङ्मुखता नव्हती. महात्माजी स्वतः श्रेष्ठ कर्मयोगी असल्यामुळे निवृत्तीचा त्यांच्या राजकारणाला वासही नव्हता. त्याचप्रमाणे जुन्या काळची अप्रतिकार वृत्ती त्यात नव्हती. इतकेच नव्हे तर प्राणपणाने अन्यायाचा प्रतिकार हाच त्यांचा संदेश होता. आणि प्रतिकाराची ही रग एका मदांध सत्तेशी संग्राम करीत राहून त्यांनी या भरतभूमीतील हीनदीन जनतेत निर्माण केल्यामुळे आपले राष्ट्र आज नभोमंडळात उंचच उंच जाऊन बसले आहे. जुन्या अध्यात्माचा निवृत्ती, अप्रतिकार, उदासीनता हा एक भाग महात्माजींनी निखालस नष्ट केला. पण त्याचा दुसरा भाग म्हणजे बालभाव, श्रद्धा, नाममहिम्याचे श्रेष्ठत्व, प्रार्थनेची गुणावहता, बुद्धीच्या व तर्काच्या निर्णयाला कमी लेखून आत्म्याच्या हुंकाराच्या आज्ञा शिरसावंद्य मानण्याची वृत्ती- हा जो दुसरा घटक याचे महत्त्व त्यांनी कमी तर केले नाहीच तर उलट अनेक पटींनी वाढवून ठेविले. आणि यामुळे आमच्या अंगच्या कार्यक्षमतेच्या गुणाला मोठा धक्का पोचला असे माझे मत झाले आहे. आणि ते त्या महापुरुषाच्या चरणाशी निवेदन करण्याची मी अनुज्ञा मागतो.
 आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याचे श्रेय कोणत्या शक्तीला जाते याची अनेकांनी मीमांसा केली आहे. त्या मीमांसेचा विचार केला तर तो आपल्या विषयाच्या दृष्टीने उद्बोधक होईल. काँग्रेसच्या बहुतेक सूत्रधारांचे, प्रवक्त्यांचे व अनुयायांचे मत असे आहे की, आपण अध्यात्मबलाने, सत्य-अहिंसेच्या बलाने स्वातंत्र्य मिळविले आहे आणि म्हणून त्यांच्या मीमांसेत सुभाषचंद्रांच्या प्रयत्नांना स्थानच नाही. कारण त्यांचे प्रयत्न शुद्ध जडसामर्थ्यनिष्ठ होते. वास्तविक पाहता काँग्रेसने व महात्माजींनी या देशातील असंख्य जनतेत कायदेभंग, करबंदी, बहिष्कार यांच्या साह्याने जी अलौकिक व अभूतपूर्व अशी प्रतिकारशक्ती जागृत केली आणि एकराष्ट्रीयत्वाच्या व लोकशाहीच्या भावनेने त्यांच्यात जी संघटना निर्माण केली ती आपल्या स्वातंत्र्याचा मुख्य आधार आहे. पण हे अगदी शुद्ध भौतिक बल आहे आणि केवळ या बळामुळेच स्वातंत्र्य मिळाले असे म्हटले तर हिंदुस्थानला जगाचे गुरुस्थान मिळणार नाही, आणि काँग्रेसच्या राजकारणाचे अलौकिकत्व सिद्ध होणार नाही, अशी लोकांना चिंता वाटते; आणि म्हणून