पान:माझे चिंतन.pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






सरस्वतीची हेळसांड






समर्थांच्या वाङ्मयात
 समर्थ रामदासस्वामींच्या कार्याची आता मराठी पंडितांनी खूप चिकित्सा केली आहे. त्या चिकित्सेत कितीही भिन्न मते प्रगट झाली असली, तरी सतराव्या शतकात महाराष्ट्रांत झालेल्या क्रांतीच्या श्रेयात समर्थ अंशभागी होते याबद्दल दुमत नाही. क्रांतिपूर्व जागृती घडवून आणण्यासाठी समर्थ स्वतः व त्यांचे शिष्य हे सर्व हिंदुस्थानभर वणवण भटकत होते व आपल्या वाणीने लोकांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून देत होते. क्रांतीला संघटित सामर्थ्याची फार आवश्यकता असते. समर्थांनी या भूमीत शेकडो मठ स्थापन करून त्या दृष्टीने सिद्धता करून ठेवलीच होती. पण समर्थांचे खरे कार्य याहून निराळे आहे. त्यांच्यापूर्वी महाराष्ट्रात निवृत्तिमार्गाचे प्राबल्य फार होते. निवृत्तिमार्गी आचार्यांनी संसारविमुखतेचा तीनशे वर्षे उपदेश करून लोकांच्या मनातील राजसगुणी ऐहिक आकांक्षा उच्छिन्न करून टाकल्या होत्या. ऐहिक प्रपंचाविषयी, या भूमीच्या उत्कर्षापकर्षाविषयी लोक उदासीन होऊन बसले होते. परमार्थातील विश्वकुटुंबवाद ऐहिकात घुसविल्यामुळे राजकीय आकांक्षांना अवश्य असणारा आपपरभाव, शत्रु- मित्रभाव हा नाहीसा झाला होता. संसार करणे हे पाप आहे, निदान तो गौणपक्ष आहे असा विचार सर्वत्र रूढ झाला होता. समर्थांनी ही विचारसरणी, हे तत्त्वज्ञान नष्ट करून लोकांना प्रपंचाचे, राजकारणाचे, ऐहिक आकांक्षांचे, स्वराज्य- साम्राज्याचे तत्त्वज्ञान शिकविले. प्रपंच केला नाही तर परमार्थही बुडेल हे लोकांना दाखवून दिले. सुंदर स्त्री व मुलेबाळे असणे दुर्भाग्य नसून हा 'सुकृताचा योग आहे' असे सांगितले. राज्ये मिळतात ती बाहुबल, मुत्सद्देगिरी यांनी