पान:माझे चिंतन.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चौथ्या दशांशाची दक्षता ! १३५ 

असे जर नसेल तर पुढील उपदेशाची संगती तुम्ही कशी लावाल?
 एका फार मोठ्या संस्थेच्या प्रमुखांनी आपल्या अनुयायांना उपदेश करताना असे उद्गार काढले : 'मला माणसे कशी हवी ते सांगतो. रामकृष्ण परमहंस यांच्या जवळ एक सेवक होता. त्याला कागदावर 'अ' हे अक्षरसुद्धा काढता येत नसे. कसलाही व्यवहार त्याला समजत नसे. फुले आण म्हटले फुले आणावी, पाणी आण म्हटले पाणी आणावे आणि एरवी रामकृष्णांच्या पायाशी बसून राहावे, अशी त्याची वृत्ती होती. आणि रामकृष्ण त्याच्यावरच खरे प्रसन्न असत. या रामकृष्णांच्या सेवकासारखे कार्यकर्ते मला पाहिजे आहेत.' अजागळपणाची याहून जास्त प्रशंसा अन्यत्र कोठे सापडेल का ?
 भोळेपणा, साधेपणा, भाबडेपणा यांच्या या प्रशंसेचे बीज वर सांगितल्याप्रमाणे आपल्या परमार्थवृत्तीत, अध्यात्मवृत्तीत आहे. देव भावाचा भुकेला आहे, त्याला दुसऱ्या कशाचीही गरज नाही आणि देवावाचून दुसरे काही प्राप्तव्य नाही, अशी आपली श्रद्धा असल्यामुळे कार्यक्षमतेला अवश्य असलेल्या गुणांची अवहेलना करण्यास आपण चटावलो आहो. केवळ श्रद्धा, पावित्र्य, हेतूची शुद्धता यांनी कार्य होते, यशप्राप्ती होते असा भ्रम आपण बाळगून आहो. दक्षता, तत्परता, कार्यकुशलता, व्यवस्था या गुणांचा आज अगदी प्रत्यक्ष तिटकारा आपण करीत नाही; पण सार्वजनिक जीवनात लाच घेणे, वशिला लावणे, खोटे हिशेब लिहिणे हे भयंकर गुन्हे आहेत अशी जी आपली बुद्धी आहे ती बेसावधपणा, अजागळपणा, अनियमितपणा, भोंगळ कारभार यांविषयी नाही. पहिल्या गुन्ह्यांना कायद्यात शिक्षा आहे; दुसऱ्यांना कायद्यात तर नाहीच, पण जनमनातही नाही. वास्तविक पहिल्यामुळे जनतेचे जेवढे नुकसान होते, तिला जो त्रास होतो, यातना सोसाव्या लागतात तितक्याच यातना कार्यकर्त्याच्या अंगच्या दुसऱ्या प्रकारच्या अवगुणांमुळे सोसाव्या लागतात.
 भोळेपणा, श्रद्धाळूपणा, बालवृत्ती याची महती परमार्थप्रवणतेमुळे आधीच या देशात फार होती. पाश्चात्त्यांच्या आगमनानंतर भौतिकवादाच्या प्रसारामुळे, विज्ञानाच्या अभ्यासामुळे, आणि ऐहिक आकांक्षांच्या वाढीमुळे ती वास्तविक कमी व्हावयाची. तशी ती होतही होती; पण इतक्यात आध्यात्मिकतेने पुन्हा जोर केला. महात्माजींचे अध्यात्मबलाचे राजकारण सुरू झाले आणि त्यामुळे पुन्हा निरागसपणा, बालभाव, श्रद्धा, अंतःकरणाची शुद्धता, आत्मनिष्ठा यांची महती वाढून