पान:माझे चिंतन.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १३४ माझे चिंतन

त्यांच्यावर श्रद्धा ठेवणे, त्यांचे दास होणे एवढेच आपले काम अशी त्या क्षेत्रात शिकवण आहे. तेथे भोळेपणा, भाबडेपणा, श्रद्धाळूपणा, व्यवहारशून्यता हीच भूषणे मानलेली आहेत. याच वृत्तीचे तेथे माहात्म्य आहे आणि दुर्दैव असे की, ऐहिक क्षेत्रातही असा एक समज अगदी उघडपणे नाही तरी आपल्या मनात खोलवर कोठे तरी वास करून आहे. या गुणांना भोळेपणा, भाबडेपणा, अजागळपणा असे नाव दिले तर आपण हे कबूल करणार नाही; पण निरागसपणा, बालभाव, श्रद्धाळूपणा ही नावे दिली तर आपल्या हे ध्यानात येईल की, या गुणांचा मोह आपल्याला फार आहे. आपण प्रामाणिकपणे आपल्या मनाच्या सर्व विभागांचा शोध घेतला तर हे गुण असण्यात आपण भूषण मानतो असे आपल्याला आढळून येईल. वास्तविक कार्यकर्त्या पुरुषाला, 'त्याचे मन बालसदृश आहे,' हे उद्गार प्रशंसापर न वाटता शिवीसारखे वाटणे अवश्य आहे; पण आपली दृष्टी तशी नाही.
 येथे एक गैरसमज होण्याचा संभव आहे म्हणून खुलासा करतो. सार्वजनिक कार्यकर्त्याच्या ठायी सचोटी, सत्प्रवृत्ती, संयम, निःस्वार्थबुद्धी, सेवावृत्ती, जनहित- परायणता हे गुण असले पाहिजेत याबदल वाद नाही. किंबहुना कार्यक्षमता, कुशाग्रता, सावधता, कारस्थानपटुता इत्यादी जे गुण वर सांगितले त्यांच्याही आधी निर्लोभवृत्ती, भूतदया, उदारदृष्टी हे गुण अवश्य आहेत; पण त्यांचा आणि आपण ज्यांवर आसक्त आहोत त्या बालभावादी गुणांचा, श्रद्धेचा, आस्तिक्यबुद्धीचा काही एक संबंध नाही. निर्लोभी, निःस्पृह सत्प्रवृत्त असा माणूसही दक्ष, कुशाग्र, कारस्थानी, कठोर असा असू शकतो आणि असा तो असला तरच तो यशस्वी होतो. आपले दुर्दैव असे की, आपल्याठायी कार्यक्षमतेस अवश्य असणाऱ्या या दोन्ही प्रकारच्या गुणांचा अभाव आहे; पण त्याहून मोठे दुर्दैव असे की, पहिल्या प्रकारच्या गुणांची महती आपण जशी जाणली आहे तशी दुसऱ्या प्रकारच्या गुणांची जाणलेली नाही; किंबहुना त्यांचा काहीसा तिटकारा आपल्या मनात आहे आणि बालभाव, भोळेपणा, अजाण भाबडी वृत्ती यांचा मोह आपल्याला आहे. काहीजणांच्या मनात असा अगदी तिटकारा नसला तरी त्यांचा असा समज आहे, की, हृदय निर्मळ असले की निर्मळ बुद्धी ही प्राप्त होतेच होते. हे दोन्ही प्रकारचे गुण एकरूपच आहेत असे ते मानतात; पण ही भूमिका सुद्धा फार थोड्या लोकांची आहे. बहुसंख्य लोकांना भोळेभाबडेपणाचेच महत्त्व विशेष वाटते; बुद्धीच्या गुणांचे त्यांना वावडे आहे.