पान:माझे चिंतन.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चौथ्या दशांशाची दक्षता ! १३३ 

कामाची वाटणी शेवटच्या कारकुनापर्यंत केलेली असते. धोरण आखणे, दिशा ठरविणे, योजना करून देणे हा कोणत्याही कार्याचा एक भाग असतो आणि योजनांप्रमाणे उठाव करणे हा त्याचा दुसरा भाग असतो. दुर्दैव असे की आपल्या देशात या दोन्ही भागांत कार्यक्षमतेचे दारिद्र्यच आहे. पण हे मान्य केले तर उत्तर भागांतील कार्यक्षमतेची जी उणीव, जे दारिद्र्य, त्याचे अपश्रेय बहुसंख्य जनतेकडेच जाईल. तेव्हा चिकित्सा करताना सर्वांनी अंतर्मुख दृष्टी ठेवली पाहिजे हे उघड आहे.
 चिकित्सा करू लागताच आपल्यातील पहिला मोठा दोष माझ्या ध्यानात येतो तो असा : माणसाच्या अंगचा प्रत्येक गुण हा कोणत्या तरी विशिष्ट वृत्तीतून निर्माण होत असतो आणि ही वृत्ती त्याच्या मनावर ज्या तत्त्वज्ञानाचा पगडा असतो त्यातून उद्भूत होत असते. साहस, अविरत संग्राम करण्याची चिकाटी इत्यादी गुण युरोपीय लोकांत दिसतात ते त्यांच्या भौतिकवादावरील निष्ठेमुळे व ऐहिकावरील प्रेमामुळे निर्माण झालेले आहेत. हे प्रेम नाही म्हणजे हे गुण नाहीत किंवा असलेच तर फार अल्प प्रमाणात, निजोर अवस्थेत असावयाचे. कार्यक्षमता या गुणाचे असेच आहे. त्याचे मूळ अशाच एका तत्त्वज्ञानात आहे आणि त्याच्या अभावाकडे मला वाचकांचे लक्ष वेधावयाचे आहे.
 कोणत्याही कार्याचे यश हे योजना, आखणी, त्याची अंमलबजावणी, शिस्त, नियमितपणा, सावधता, शास्त्रीय व तांत्रिकज्ञान, संघशक्ती यावर अवलंबून असण्यापेक्षा ते कार्य करणाऱ्याच्या मनाची शुद्धता, त्याचे उच्च संकल्प, त्याच्या हेतूची पवित्रता, त्याच्या मनातील भूतदया, त्याचे श्रद्धायुक्त अंतःकरण, त्याचे निरागस, निष्पाप, बालसदृश मन यांवर अवलंबून आहे असा एक समज, अशी एक श्रद्धा आपल्या मनात खोल मूळ धरून बसलेली आहे. मागल्या काळी सर्व काही परमेश्वरी कृपेवर, दैवाच्या अनुकूलतेवर आणि नशिबाच्या फाशावर अवलंबून आहे असा भाव होता. तो आता नष्ट झाला आहे हे खरे; पण त्याच्या जोडीचा हा दुसरा समज, हा दुसरा भाव अजून नष्ट झालेला नाही. मनाची शुद्धता, निरागसता, एवढेच नव्हे तर भोळेपणा, भाबडेपणा याची काही विशेष महती आहे अशी आपली समजूत आहे. अध्यात्मामध्ये व परमार्थक्षेत्रात केवळ भोळ्या भावाने सिद्धी प्राप्त होते हे तर अनेक संतमहंतांनी सांगितलेच आहे. सर्व भरिभार पांडुरंगावर, गुरुचरणांवर व संतांवर घालून आपण निश्चिंत व्हावे;