पान:माझे चिंतन.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १३२ माझे चिंतन

 फ्रेंच लष्करात असा गोंधळ होता. उलट जर्मन सेना यंत्रासारख्या हलत होत्या. बिस्मार्क, रून व मोल्टके यांच्या योजना ठरलेल्या होत्या, मार्ग आखलेले होते व धोरणे निश्चित झालेली होती. कल्पनाशक्ती, निश्चय, साहस या गुणांनी त्यांचे अधिकारी संपन्न होते. फ्रान्स व जर्मनी यांच्या या संग्रामाचे पर्यवसान काय झाले ते जगाला माहीतच आहे. सेडानला लढाई झाली नाही, कत्तल झाली असे इतिहासकार म्हणतात.
 आपल्या देशातल्या कोणत्याही संस्थेच्या कारभाराकडे पाहिले म्हणजे मला सेडानच्या लढाईतल्या फ्रेंचांच्या मेट्झच्या छावणीची आठवण होते. येथल्या म्युनिसिपालिट्या, एस् एस्. सी. बोर्डासारखी परीक्षामंडळे, पोष्टासारखी खाती, नित्य नवीन निघणाऱ्या कंपन्या, कारखाने, बँका, निरनिराळे क्रीडासंघ यांचे कारभार पाहिले म्हणजे असे वाटते की, दुर्देवाने आपल्यावर एखाद्या युद्धाची आपत्ती ओढवली तर आपली स्थिती या फ्रेंच सेनेसारखी झाल्यावाचून राहणार नाही. कर्तृत्व, कार्यक्षमता, व्यवस्था यांचा आणि आपला सात जन्मांत कधी संबंध आला होता की नाही, अशी शंका यावी, अशीच आपली सध्या स्थिती झाली आहे. आपल्याठायी उत्साह भरपूर आहे, थोडा जास्तच आहे! आपल्या आकांक्षा फार मोठ्या आहेत. आपण लवकरच जगाला मार्गदर्शन करून त्याच्या गुरुस्थानी आरूढ होणार आहोत. आध्यात्मिक सामर्थ्याने तर आपण फारच संपन्न झालेले आहो आणि त्यामुळे युरोपच्या भौतिक सामर्थ्याला वाकुल्या दाखविण्याचा कार्यक्रम रोज आपण एकदा तरी करतोच. तेव्हा उत्साह, आकांक्षा दिव्यदृष्टी, आध्यात्मिक बल इत्यादी गुणांची श्रीमंती आपल्या ठायी आलेली आहे; पण असे ध्यानात ठेवले पाहिजे की, हे गुण फ्रान्सजवळही होते, तरी त्याची धूळधाण झाली. तेव्हा ऐहिक, व्यावहारिक यशाचा व या गुणांचा संबंध फार थोडा असावा असे वादापुरते तरी आपण मान्य केले पाहिजे.
 या कर्तृत्वहीनतेची, नालायकीची नादानीची चिकित्सा करताना एक गोष्ट ध्यानी धरली पाहिजे की, या बाबतीत केवळ नेते, अधिकारी किंवा त्या त्या स्थानावरचे सूत्रधार यांना दोष देऊन स्वस्थ बसणे हे युक्त नाही. अपयशाचा मोठा वाटा त्यांच्या माथी जाईल हे खरे; पण एवढेच म्हणून भागणार नाही. दर क्षणाला पन्नास घटना घडत असतात आणि त्यांची जबाबदारी व चिंता निरनिराळ्या अधिकाऱ्यांकडे सोपविलेली असते. या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयापुरती