पान:माझे चिंतन.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चौथ्या दशांशाची दक्षता ! १३१ 

'सरकार, मालगाडीच्या वाघिणी आहेत, पण त्या येथून तीस मैलांवर आहेत. बादशहाचा संताप अनावर झाला. दोन लक्ष लोकांना उपाशी ठेवायचे की काय ? वाघिणी असलेल्या ठिकाणी तारा गेल्या. तेथील अधिकाऱ्याने कळविले की, वाघिणी आहेत, पण त्यांना चाके नाहीत! आता बादशहा हतबुद्धच झाला. शेवटी, तोफखान्याचे घोडे सोडून ते गाड्यांना जोडून दाणागोटा आणावा, असा त्याने हुकूम दिला.
 मग लढाईची व्यवस्था पाहावी असे त्याच्या मनात आले. या वेळी सैनिकांना 'ब्रीच लोडिंग' या नावाच्या अगदी नव्या तऱ्हेच्या बंदुका देण्यात आल्या होत्या. या त्या काळी प्रचलित असलेल्या इतर कोणत्याही बंदुकांपेक्षा जास्त मारक होत्या. त्या हाती देऊन संचलन करण्यास सांगा, असे त्याने फर्माविले. बंदुका घेऊन सैनिक उभे राहिले. बादशहा तपासणी करू लागला. सैनिकांनी बंदुका अशा अजागळासारख्या धरल्या होत्या की बादशहाला अनेक शंका येऊ लागल्या; म्हणून त्याने चारपाच सैनिकांना विचारले. ते म्हणाले 'या बंदुका आजच प्रथम आमच्या हाती दिलेल्या आहेत. आम्ही यापूर्वी त्या केव्हाच पाहिल्या नव्हत्या; त्या कशा धरावयाच्या व चालवावयाच्या याची आम्हांला काही कल्पना नाही.' बादशहा संतापाने लष्करी अधिकाऱ्यांकडे पाहू लागला. खाली मान घालून ते म्हणाले, 'सरकार, ते शिकवावयाचे राहून गेले आहे.'
 'मग सर्व उद्योग सोडून आज रात्रभर ते शिक्षण आधी द्या.' बादशहाने आज्ञा दिली.
 'होय सरकार.' माना जास्तच खाली घालून लष्कराधीश म्हणाले, 'पण... पण... या बंदुकांचे तज्ज्ञ शिक्षक छावणीवर नाहीत. त्यांना काही दुसऱ्या कामासाठी बोर्डोला (फ्रान्सच्या दुसऱ्या टोकाला) पाठविले आहे.'
 निराशा, भीती, संताप यांनी बादशहा पराकाष्ठेचा खवळून गेला. त्याचे मस्तक बधिर होऊन गेले. तो तसाच छावणीत गेला. विछान्यावर अंग टाकल्यावर आपली सध्याची भौगोलिक अवस्था तरी काय आहे हे पाहावे असे मनात येऊन त्याने फ्रान्सचे लष्करी नकाशे मागविले. त्या अधिकाऱ्याने येऊन सांगितले की, 'जर्मनीवर चढाई करावयाची, बर्लिनवर चालून जावयाचे, असा बेत निश्चित झाला असल्यामुळे आम्ही फक्त जर्मनीचे नकाशे बरोबर आणलेले आहेत. फ्रान्सचे नकाशे लष्कराबरोबर आणलेलेच नाहीत.'