पान:माझे चिंतन.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १२८ माझे चिंतन

भांडवलाच्या रूपाने प्रारंभीचा खर्च करण्यात आला आहे. पिकांची रखवाली सगळा गाव अशाच सहकारी पद्धतीने करीत आहे. त्यामुळे चोरामारीचा, पिके कापली जाण्याचा संभव नाही.
 सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या खानापूर गावी डॉ. मोडक यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी आज दहाबारा वर्षे सहकारी पद्धतीने श्रम करून रस्ते, देवालये, शाळा अशी जवळजवळ पन्नास हजार रुपयांची कामे केली आहेत.
 पुण्याचे सुप्रसिद्ध चित्रकार गोंधळेकर यांनी काही मित्रांच्या साह्याने 'नवा गाव' नावाची संस्था स्थापन केली आहे. वाल्हे या गावी नुकतेच त्यांनी तेथील वस्तूंचे एक प्रदर्शन भरविले. त्यामुळे गावकऱ्यांच्या सहकारी वृत्तीला चालना मिळून आता सहकारी पद्धतीने गावाजवळ बंधारा बांधण्याची योजना ते आखीत आहेत.
 उत्तर प्रदेशातील बातमी वर्तमानपत्रात आली आहे. ती फारच आशादायक आहे. लोकसत्ताक- सप्ताहात त्या राज्यातील २० लक्ष लोक सामील झाले होते. त्यांनी या पद्धतीने ७८०० मैल लांबीचे रस्ते बांधले, २४३ तळी बांधली, अनेक विहिरी खणल्या, कालवे खोदले आणि शाळा, देवालये यांसाठी अनेक इमारती बांधल्या.

मानवतेचा साक्षात्कार

 ही वृत्ती प्रसृत झाली तर आज सरकारी साहाय्यावाचून अडून पडलेली अनंत कामे भराभर सिद्धीस जाऊन आपल्या देशात विपुल धन निर्माण होईल. पण या पद्धतीने कामे झाल्यास सर्वांत मोठा फायदा होईल तो हा, की लोकशाहीला अवश्य तो नवा माणूस, नवा नागरिक यातून निर्माण होईल. आपल्या जीवनाचे कायदे दुसऱ्या कोणी करून ते आपल्याकडून सक्तीने पाळून घेणे याचे नाव पारतंत्र्य आणि आपले कायदे आपणच करून स्वखुषीने पाळणे याचे नाव स्वातंत्र्य. प्रत्येक गावी पाटबंधारे, शेती, शाळा आणि गावचा सर्व कारभार सहकारी पद्धतीने होऊ लागला तर स्वतंत्र्याचा खरा अर्थ लोकांना कळेल, एवढेच नव्हे तर तो त्यांच्या आचरणात येईल आणि या प्रयत्नांतच जातिभेद, वर्गभेद, गावात विनाकारण माजलेल्या फळ्या यांचा लोप होईल. रिकामपणामुळे, दारिद्र्यामुळे, गटबाजीमुळे निर्माण होणारे अनेक दुर्गुण नाहीसे होतील, आणि माणसाचा