पान:माझे चिंतन.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमची फौजदारनिष्ठा १२७ 

आणि सहकारी तत्त्वावर सामाजिक जीवन निर्माण करणे हे यापुढे आपले ध्येय असले पाहिजे.

सहकारी वृत्तीची जोपासना

 ब्रिटनमध्ये पाचशे वर्षे प्रयत्न करून ठेचा खात, प्रयोग करीत, तत्त्वे ठरवीत, सिद्धान्त बांधीत या प्रयत्नांत लोकांनी पुष्कळच यश मिळविले आहे; पण त्याला पाचशे वर्षे लागली. रशियात ते कार्य दंडसत्तेने अल्प कालात सिद्ध झाले आहे, असे म्हणतात. ब्रिटन इतका कालावधी न लावता आणि दंडसत्तेचा आश्रय न करता आपल्याला ते साधेल का, हा प्रश्न आहे. सरकारने खेडेगावच्या आर्थिक व्यवहारासाठी शेतकऱ्यांना कर्जे, तगाई सुलभपणे मिळावी म्हणून अनेक ठिकाणी सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या; पण लोकांनी त्या सर्व विफल करून टाकल्या आहेत! आणि आपले उद्दिष्ट तर असे आहे, की केवळ आर्थिकच नव्हे, तर आपले सर्वच व्यवहार सहकारी पद्धतीने व्हावे. शेती, उत्पादित मालाची खरेदी- विक्री, गावातील घरे, रस्ते, पाटबंधारे यांची बांधणी- सर्व, सर्व व्यवहार सहकारी पद्धतीने झाले तरच लोकशाहीला अवश्य ते विपुल धन निर्माण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी येईल. सध्या विपुल धन निर्माण झाल्यानंतर समाजाने ज्या आकांक्षा धरावयाच्या तेवढ्या मनात बाळगून त्या पुऱ्या झाल्या नाहीत तर संग्राम करावा अशी वृत्ती तेवढी तयार झाली आहे ! विपुल धन निर्माण करण्यास अवश्य ते सहकारी जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र आपण करीत नाही.
 सहकारी पद्धतीच्या जीवनाची काही उदाहरणे प्रत्यक्ष पाहिल्यावाचून त्याची कल्पना येणार नाही. सुदैवाने आपल्या देशात ही कल्पना रुजत जाऊन कोठे कोठे तसे प्रयत्न सुरू झाले आहेत. इतर ठिकाणी ही उदाहरणे उद्बोधक ठरतील म्हणून त्यांचा निर्देश करीत आहे.
 खानदेशात धुळ्याजवळ मोरणे या गावी दशरथ पाटील यांनी या तऱ्हेचा एक उत्कृष्ट प्रयोग केला आहे. दुष्काळाच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी त्यांनी गावाजवळचा नकाण्याचा कोरडा पडत चाललेला तलाव सहकारी शेतीसाठी घेतला व त्यातील पन्नास एकरांची सहकारी पद्धतीने मशागत करून आता त्यात पिके उभी केली आहेत. जमिनीची साफसफाई, नांगरट, पेरणी वगैरे सर्व कामे सर्व गावाने केली आहेत. पाच रुपयांचा एक असे २०० भाग काढून जमलेल्या