पान:माझे चिंतन.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमची फौजदारनिष्ठा १२९ 

पुनर्जन्म होईल. सहकारी पद्धतीचे सर्वात जास्त महत्त्व असेल तर ते यासाठी आहे.
 जबाबदारीची जाणीव, अहोरात्र केलेले कष्ट आणि समोर दिसणारी सुबत्ता यामुळे मनुष्याच्या वृत्तीतील हीन गुण जळून जाऊन त्याचे सत्त्वगुण वाढीस लागतात. आणि सहकारी पद्धतीत हे सर्व गुण एकवटलेले असल्यामुळे तिच्या आश्रयाने आपली लोकसत्ता अगदी अल्पावकाशात सार्थ होण्याची शक्यता आहे. दंडसत्तेचा आश्रय न करता आणि प्रदीर्घ कालावधी न लावता या देशात समृद्धी व स्वास्थ्य निर्माण करून येथील लोकसत्ता सार्थ व समर्थ कशी करावी ही भारतापुढे येऊन पडलेली समस्या या एकाच मार्गाने सोडविता येईल.
 पण त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाच्या वृत्तीत पालट झाला पाहिजे. आपण स्वतः आपल्याला पाहात आहो ही भीती पुरेशी असली पाहिजे. आपल्या नीतीचे, कर्तव्यबुद्धीचे, समाजहिततत्परतेचे आपले आपणच संरक्षक आहो, त्यासाठी पोलिसाची आवश्यकता नाही अशी भावना आपल्या मनात उदित झाली पाहिजे. सध्या पोलिसशिपायाला आपण स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानतो; त्याला भितो. त्याऐवजी स्वतःला श्रेष्ठ मानून आपण आपल्याला भिऊ लागलो तर लोकशाहीच्या नवयुगास भारतात प्रारंभ होईल यात कसलाही संदेह नाही.

(एप्रिल १९५३)