पान:माझे चिंतन.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १२६ माझे चिंतन

काढावा, माल खपवावा, भांडवल गुंतवावे, बाजारपेठ शोधावी, स्पर्धेला तोंड द्यावे, जगभर हिंडावे हा व्याप फार प्रचंड आहे; हा करावयाचा तर त्याला पैशाचे, फायद्याचे तसेच जबरदस्त विलोभन हवे; ते नसेल व उत्पादनसाधने घेतल्यावर मी नुसता पगारी नोकरच राहणार असेन, तर मी इतका प्रचंड व्याप काय म्हणून करावा, असा प्रश्न येतो. त्याला उत्तर दिले नाही, म्हणजे दुसरे तसेच विलोभन निर्माण केले नाही तर मनुष्य काम करण्यास, जीव पणाला लावून कष्ट करण्यास तयार होत नाही! रशियातील मनुष्य याला अपवाद नव्हता. यामुळे तेथे भयानक अशी जुलमी राजवट निर्माण झाली. सध्या भारतापुढे तशीच बिकट समस्या येऊन पडली आहे. येथे लोकशाहीसाठी अवश्य अशी जी वृत्ती समाजात निर्माण होणे अगत्याचे आहे, ती वृत्ती आपण स्वत: होऊन निर्माण करणार आहोत की येथेही या दंडाची, हुकूमशाही दंडुक्याची अपरिहार्यता भासणार आहे ही ती समस्या आहे. आपण आपला सर्वस्वी कायाकल्प करून घेतला तरच आपल्याला भेडसावणारी यमदंडाची आपत्ती टळण्याचा संभव आहे. आपल्या मनाची मशागत अगदी निराळ्या पद्धतीने आपण केली तरच हे नवे पीक भरघोसपणे आपणास काढता येईल.
 फार पुरातन काळापासून आपण स्वतःला समाज असे म्हणवीत आहो. भारतीय समाज, हिंदुसमाज, आर्यसमाज असा आपण इतिहासात स्वत:चा निर्देश केला आहे, आणि भाषेच्या सोयीच्या दृष्टीने ते योग्यच आहे. मला सांगावयाचे आहे ते हे, की असा 'समाज' म्हणून जरी आपण स्वतःचा निर्देश करीत असलो तरी सामुदायिक जीवनाची कसलीही जाणीव निर्माण करण्याची आपण खटपट केलेली नाही. आपण एकमेकांच्या शेजारी राहात होतो, एका भूमीवर वाढत होतो इतकेच. सर्व समाजाच्या अन्नवस्त्राची, विद्येची, संस्कृतीची नीतिअनीतीची चिंता वाहण्याची पद्धतच येथे कधी निर्माण झाली नव्हती. सार्वजनिक कार्ये सर्व राजाने करावयाची अशी रूढी होती. हे येथेच होते असे नाही, सर्व जगभरच तसे होते. युद्धाच्या काळीच फक्त सामुदायिक जीवनाची जाणीव आपणास होत असे आणि तीही फार मर्यादित. कारण आपण लढाया करीत होतो ते राजाचे पगारी नोकर म्हणून. पूर्वी सर्व सैन्ये भाडोत्रीच असत. अशा या जीवनाच्या पातळीतून पूर्ण सामुदायिक जीवनाच्या पातळीवर आपणांस आता चढावयाचे आहे. लोकशाही, समाजवादी लोकशाही याचा हाच अर्थ आहे.