पान:माझे चिंतन.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमची फौजदारनिष्ठा १२५ 

 सरकारवर टीका करण्यापूर्वी प्रत्येकाने हे आत्मचरित्र वाचले तर सरकारवर टीका करण्याची गरज फारशी राहणार नाही. येथला अमुक एक वर्ग या वृत्तीचा नाही असे नाही. 'मी स्वतः पाहात आहे, तेव्हा अपकृत्य करू नये' इतकी स्वतःविषयी उच्च भावना येथे निर्माणच झालेली नाही. विद्यार्थ्यांच्याच गोष्टींची जरूर नाही. परवा दिल्लीला राष्ट्राध्यक्षांनी शिक्षकांविषयी आपुलकी वाटून, ते भावी पिढीचे मार्गदर्शक आहेत, शिल्पकार आहेत हे जाणून चार हजार प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रपति भवनात निमंत्रण दिले. त्यावेळी या 'शिल्पकारां' नी तेथल्या मूळच्या शिल्पकलेवर पानतंबाखूच्या पिचकाऱ्या टाकल्या, सामानाची खराबी केली आणि बऱ्याच कपबश्या फोडल्या! ते परत गेल्यावर शिक्षणखात्याच्या अधिकाऱ्यामार्फत या मार्गदर्शकांना तंबी देऊन अध्यक्षांना मार्गदर्शन करावे लागले! आगरकरांनी म्हटले आहे, की "नियमन आणि संवर्धन ही सरकारची दोन कामे; ज्या देशात नियमनातच सर्व शक्ती खर्च होते- म्हणजे जेथे लोक फौजदारनिष्ठ आहेत तेथे संवर्धनाला शक्ती शिल्लक राहात नाही व देशाची प्रगती होत नाही."

मनोभूमीची नवी मशागत

 वर्षानुवर्षे आपण आपल्या शेतात एक पीक काढीत राहिल्यानंतर पुढे त्याच जमिनीत निराळे पीक काढण्याचा जर आपण विचार केला तर आपली जमीन कसण्याची व मशागतीची पद्धत सर्वस्वी बदलणे अवश्य आहे हे कोणालाही पटण्याजोगे आहे. खत बदलावे लागेल, पाणी कमीजास्त करावे लागेल, बांध उंच किंवा खालपट कर।वे लागतील, नांगरट जास्त खोल करावी लागेल, पिकांचा हंगाम बदलणे भाग पडेल असे अनेक प्रकारचे बदल करावे लागतील. त्याचप्रमाणे शतकानुशतके ज्या भूमीत आपण राजसत्तेची प्रस्थापना केली होती त्याच भूमीत आता लोकसत्तेची उभारणी करताना या नव्या रोपाची मशागत व त्याची जपणूक करण्याची पद्धत सर्वस्वी निराळी असली पाहिजे हे अगदी सहज ध्यानात येण्याजोगे आहे. येथे आपणांस लोकशाहीच नव्हे तर समाजवादी लोकशाही स्थापावयाची आहे!
 सोव्हिएट रशियात समाजवाद आणावयाचे ठरले व त्याची पहिली पायरी म्हणून उत्पादन- साधनांवरील धनिकांचे स्वामित्व नष्ट करण्यात आले; पण ही फक्त बाह्य घडामोड झाली. आंतरिक घडामोड कोणती करावी लागली ? कारखाना