पान:माझे चिंतन.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमची फौजदारनिष्ठा १२३ 

भेटावयास येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहून अडाणी शेतकऱ्यांच्यांत आणि या विद्वान विद्यार्थ्यांच्यांत काय फरक आहे असा प्रश्न माझ्या मनात उद्भवतो. आपले यात हित आहे, हे गृहपाठ आपल्या फायद्याचे आहेत हे सर्वांना मान्य आहे. असे असूनही सक्ती केल्यावाचून, कोठला तरी दंड उगारल्यावाचून हे स्वहिताचे काम त्यांच्याकडून होत नाही; हाही फौजदारनिष्ठेचाच नमुना नव्हे काय ?
 परवा विद्यार्थ्यांना मी एक गमतीचा हिशेब सांगितला. पोलीस उभा नसेल तर हे विद्यार्थी दडपून वाटेल त्या बाजूने सायकली नेतात. ही गोष्ट अगदी क्षुद्र वाटते; पण हिशेब काय होतो तो पाहा. अतिशय गर्दी असेल तेथे पोलीस काही झाले तरी अवश्य आहेत; पण काही चौक असे आहेत, की नागरिकांनी आपण होऊन वाहनांचा कायदा पाळावयाचे ठरविले तर तेथे पोलिसाची गरज राहणार नाही. पण दडपून दुसऱ्या बाजूने जाण्यात आपल्याला गंमत वाटते; कायदा आपण होऊन पाळण्यात मेंगळटपणा वाटतो. हिंदुस्थानातल्या सर्व शहरांतील अशा चौकांचा हिशेब केला तर या अनावश्यक पोलिसांसाठी आपला एक कोटी रुपये दरसाल खर्च, असा हिशेब होतो ! हा हिशेब गमतीचा आहे असे मी वर म्हटले. वास्तविक तो प्राणघेणा हिशेब आहे; पण विद्यार्थ्यांना ती गंमत वाटते. म्हणून त्याला गमतीचा हिशेब असे म्हटले आहे.

आत्म्यास साक्ष ठेवून

 सध्या सरकारने देशात समृद्धी निर्माण करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत; पग एकही योजना यशस्वी होत नाही! याच्या कारणांचा आपण विचार केला पाहिजे. कुळकायदा, ग्रामपंचायतींची स्थापना, अनेक प्रकारच्या सरकारी संस्थांची स्थापना, साक्षरताप्रसाराची मोहीम, अन्नधान्याची मोहीम, ग्रामविकास- योजना, पाटबंधाऱ्यांच्या योजना, आरोग्य केंद्रे- अनंत प्रकारच्या योजना आहेत; पण बहुतेक सर्व अयशस्वी होत आहेत. हे अपयश पाहून त्याचे खापर सर्वस्वी सरकारच्या माथी फोडण्याची चाल सर्वत्र रूढ आहे. या टीकेत मुळीच अर्थ नाही असे मला म्हणावयाचे नाही. सत्तारूढ पक्षावर जनतेने टीकेचे शस्त्र कायम धरणे लोकशाहीत अवश्य आहे, यात शंकाच नाही; पण तितक्याच कठोरपणे ते शस्त्र स्वतःवर धरण्याची लोकशाहीत जास्त आवश्यकता असते हे मात्र आपण सोयीस्कर रीतीने निरागस, निष्पाप चेहरे करून विसरून जातो!