पान:माझे चिंतन.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १२२ माझे चिंतन

जमिनीची, हत्यारांची खरेदीविक्री कशी केव्हा करावी इत्यादी बंधने त्याच्यावर घालण्याची जरूर नाही असे वाटते. पण शाश्वती मिळताच मनुष्य उत्साही न होता, 'आता इतके श्रम करून काय करायचे आहे' असे म्हणू लागला तर? फ्रान्समध्ये खाणी, कारखाने यांचे राष्ट्रीयीकरण झाले- म्हणजे ही सर्व उत्पादनसाधने जनतेच्या ताब्यात आली तेव्हा त्यांचे उत्पादन वाढण्याच्या ऐवजी भराभर घटू लागले. 'आपण श्रम करून उत्पादन करतो ते एकटा भांडवलवाला खाऊन टाकतो' ही कामगारांची पूर्वीची तक्रार होती; आता आपल्या श्रमाचे फळ जनतेला म्हणजे आपल्यालाच मिळावयाचे आहे, असे निश्चित होताच वास्तविक कामगारांनी पूर्वीच्या पेक्षा जास्त कष्ट करावे, उत्पादन वाढवावे; पण त्यांनी तसे केले नाही. स्वार्थी, क्रूर अशा भांडवलवाल्याच्या मुकादमाच्या नजरेखाली असला तरच तो काम करणार! म्हणजे स्वतःच्या बायकामुलांना भाकरी जास्त मिळेल हे विलोभन त्याला प्रेरक होऊ शकत नाही; तर मुकादमाचा आसूड प्रेरक होतो! मुकादमनिष्ठा हा पोलिसनिष्ठेचाच एक प्रकार होय. येथे लोकांनी असे दाखवून दिले, की स्वतःचे हित साधण्यासाठीसुद्धा आपल्यांवर सक्ती करावी लागते! आत्म्याची, विवेकाची, देवाची प्रेरणा पुरत नाही. फौजदाराची जड प्रेरणा अवश्य असते.

एक कोटीची उधळपट्टी

 आमच्या पुणे विद्यापीठाने बी. ए. च्या विद्यार्थ्यांसाठी सध्या गृहपाठाची (ट्युटोरिअलची) पद्धत सुरू केली आहे. विद्यार्थ्याना दरसाल पाच प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावयाचा असतो. प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या अभ्यासविषयातील सहा प्रश्न म्हणजे एकंदर तीस प्रश्न वर्षभरात विद्यार्थ्यांनी घरी अभ्यासून लिहून आणले पाहिजेत असा नियम आहे. वास्तविक विद्यार्थ्यांना अत्यंत उपकारक असा हा नियम आहे. घरी इतके विषय वाचले जातात, लिहिण्याची सवय होते, आपल्याला लिहिता कसे येत नाही ते कळते, परीक्षेच्या वेळी एकदम भार पडत नाही, असे या पद्धतीचे अनेक फायदे असूनही हे गृहपाठ शक्य तो टाळण्याकडे बहुसंख्य विद्यार्थ्याची प्रवृत्ती असते! गृहपाठ न आले तर वर्ष बुडविण्याची धमकी देऊन विद्यापीठाने ती प्रत्यक्षात आणण्यास प्रारंभ केला तेव्हा कोठे विद्यार्थी नरम आले. तरीही वर्षातून अनेक वेळा धमकीच्या सूचना लावाव्या लागतातच. कडक सूचना फळ्यावर लागल्यावर भराभर गृहपाठ आणून देणाऱ्या, दीन चेहरे करून घरी