पान:माझे चिंतन.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमची फौजदारनिष्ठा १२१ 

सत्तेत रूपांतर होईल. पोलीस साक्षी असला तरच भ्यावयाचे, आपण स्वतः साक्षी असलो तर भ्यावयाचे नाही, ही वृत्ती आपण पोलिसाला स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजत असल्याची निदर्शक आहे. आपल्या नीतीचा, पुण्याचा रक्षणकर्ता पोलीस आहे, आपण स्वतः नाही, असे आपण ठरवून टाकले आहे. आणि आपणच असे ठरविल्यानंतर पोलिसी राज्य किंवा दंडसत्ता प्रस्थापित व्हावी यात नवल ते काय ? आपण स्वतः साक्षी असताना आपण समाजहिताचे, संस्कृतीचे, धर्माचे दंडक मोडणार नाही, समाजविघातक कृत्ये करणार नाही असे ज्या वेळी आपले ठरेल त्या वेळी आपले राज्य, म्हणजेच लोकराज्य प्रस्थापित होईल व ते यशस्वी होईल. आपण देवाला, आत्म्याला, विवेकाला पोलिसापेक्षा श्रेष्ठ मानण्याचे धोरण केव्हा अवलंबिणार एवढाच प्रश्न आहे.

'आता श्रम कशाला ?'

 परक्याच्या धनाचा अपहार करू नये, दुसऱ्याच्या हितसंबंधाचा नाश करू नये या नियमांचे पालन आपल्या हातून व्हावे एवढ्यासाठी आपल्याला पोलिसाची जरूर असते असे नाही. आश्चर्याची गोष्ट पुढेच आहे. स्वहितसुद्धा आपण पोलिसाच्या धाकावाचून करीत नाही! सरकारने कुळ कायदा केला आणि जमिनीविषयीची शेतकऱ्यांच्या मनातील अनिश्चितता कमी केली. 'आपल्या कष्टाचे फळ आपल्यालाच मिळेल' अशी ग्वाही त्याच्या मनाला सरकारने मिळवून दिली. यामुळे सर्वत्र अन्नधान्यांचे उत्पादन वाढेल, पिके जास्त येतील, अशी अपेक्षा करण्यात काहीच वावगे नव्हते; पण तसे घडले नाही. शेतकरी या आश्वासनाने उत्साही होण्याऐवजी ढिला झाला. जास्त उत्पादन करून आपण जास्त भोगावे ही वृत्ती त्याच्या ठायी निर्माण न होता, 'थोडा जास्त आळस करायला हरकत नाही' ही त्याची वृत्ती झाली. जपानी शेतकरी व येथला शेतकरी यांची तुलना सध्या नेहमी करण्यात येते. त्यात जपानी शेतकऱ्याच्या शेती करण्याच्या पद्धतीवर भर दिला जातो. त्या पद्धतीला महत्त्व आहे यात शंकाच नाही; पण त्यापेक्षा जास्त या शेतकऱ्याच्या वृत्तीला आहे.
 'सिक्युरिटी व लिबर्टी' म्हणजे निर्वाहाची शाश्वती आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांचा समन्वय कसा करावा हा लोकशाहीपुढचा फार गहन प्रश्न आहे. निर्वाहाची शाश्वती मिळताच मनुष्य जास्त उत्साहाने कामास लागेल अशी अपेक्षा असते. आणि त्यामुळे त्याने काम किती करावे, उत्पन्न धनाचा वापर कसा करावा, धनाची,