पान:माझे चिंतन.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १२० माझे चिंतन

जाणीव आपण ठेवीत नाही हेच आपल्या सर्व दुःखांचे मूळ आहे. आपण स्वतःला मोठे धर्मनिष्ठ, संस्कृतिनिष्ठ, ध्येयनिष्ठ असे समजतो, पण प्रामाणिकपणे आपण आपल्या अंतर्यामी शोध केला तर आपण सर्व पोलीसनिष्ठ, फौजदारनिष्ठ लोक आहोत हे आपल्या सहज ध्यानात येईल. समाजाचे, सरकारचे किंवा धर्माचे कायदे आपण केव्हा पाळणार ? चौका- चौकांत पोलिस उभा असेल तरच ! एरव्ही उजव्या बाजूने सायकल किंवा मोटार दडपून नेण्यास आपण मुळीच कचरत नाही ! काळा बाजार करण्याची खंत आपल्याला वाटत नाही. वकील असलो तर खोटा पुरावा देऊन खटले जिंकण्यास, डॉक्टर असलो तर वाईट औषधे देऊन रोग लांबविण्यास, शिक्षक असलो तर प्रश्नपत्रिका फोडण्यास, सरकारी अधिकारी असलो तर मुद्दाम प्रकरणे लांबणीवर टाकून पैसे दिले तरच ती आधी उरकावी या धोरणाचा अवलंब करण्यास आपल्याला कशाचीही क्षिती वाटत नाही. आपण काळजी फक्त एकच घेत असतो : " -- आपणास कुणी पाहात नाही ना? पोलीस शेजारी नाही ना? फौजदार आपल्याला पकडणार नाही ना?" तो पाहात नाही अशी खात्री असली की दुष्काळात अनाथांना वाटण्यास दिलेले पैसे स्वतः घेणे, खोटे मतदार दाखवून निवडणूक जिंकणे, आपल्या सग्यासोयऱ्यांना सरकारी कंत्राटे देणे, कॉर्पोरेशनच्या मालकीच्या खताच्या गाड्या आपल्या शेतात लोटणे, लोकल बोर्डात रस्त्याची आखणी करताना आपल्या घरावरून, शेतावरून रस्ता तयार करून घेण्याची कोशीस करणे यांत आक्षेपार्ह असे काही आपण मानीत नाही.
 आपण संस्कृतिनिष्ठ किंवा धर्मनिष्ठ असतो तर ही कृत्ये पापमय आहेत असे आपणास निश्चित वाटले असते; पण आपण फौजदारनिष्ठ असल्यामुळे तो जे पाहात नाही ते पापच नव्हे, अशी आपली श्रद्धा आहे. आपली श्रद्धा देवावर किंवा आत्म्यावर नसून पोलिसावर आहे! समाजाची वरील प्रकारे मान मुरगळताना, आपण स्वतः आपल्याला पाहात आहोत, ही भीती आपल्याला पुरेशी नाही. पुण्ये करावयाची ती फौजदाराच्या साक्षीने व पापे करावयाची ती देवाच्या किंवा आत्म्याच्या साक्षीने असे आपले धोरण आहे.
 जगात दंडसत्ता, लष्करी सत्ता, हुकूमशाही हा प्रकार जो निर्माण होतो तो आपल्या या फौजदारनिष्ठेमुळेच होत असतो. ज्या क्षणी चौकातल्या पोलिसापेक्षा आपण स्वतः श्रेष्ठ आहो असे आपणांस वाटू लागेल त्या क्षणी दंडसत्तेचे लोक-