पान:माझे चिंतन.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






आमची फौजदारनिष्ठा






 आत्मा हा सर्वव्यापी, सर्वसाक्षी आहे हे दाखवून देण्यासाठी वेदान्तात नेहमी एक उदाहरण देतात. एका गुरूने शिष्याच्या हाती एक पक्षी दिला व 'जेथे तुला कोणी पाहात नाही अशा ठिकाणी जाऊन याला मारून टाक !' असे त्याला सांगितले. हे काम फारच सोपे आहे असे वाटून शिष्य त्या पक्ष्याला घेऊन अरण्यात गेला. शेतकरी, शिकारी, भिल्ल, कातकरी यांनीही पाहू नये म्हणून तेथून अगदी गर्द झाडीच्या मध्ये जाऊन तो उभा राहिला. घनदाट राईमुळे तेथे सूर्यकिरणही येत नव्हते. तेव्हा कोणी पाहात नाही अशी खात्री वाटून त्याने पक्ष्याला समोर धरले नि आता त्याची मान मुरगळणार तोच शिष्याच्या ध्यानी आले, की 'अरे ! इथे माझे हे कृत्य कुणी पाहात नाही असं कसं म्हणता येईल ? मी स्वतः ते पाहात आहेच की !' हे ध्यानात येताच तो गोंधळून गेला. कारण आपण कोठेही गेलो तरी आपण हे कृत्य पाहणारच; आणि त्यामुळे या पक्ष्याला 'कोणाच्याही नकळत' मारून टाकणे शक्य होणार नाही असे त्याला दिसू लागले. त्यामुळे तो तसाच परत गेला व "हे अशक्य आहे" असे त्याने गुरुजींना सांगितले. आपला आत्मा प्रत्येक ठिकाणी आपल्या कृत्याचा साक्षी आहे, हा विचार शिष्याच्या ध्यानी आलेला पाहून गुरुजींना आनंद झाला.

दंडसत्ता की लोकसत्ता ?

 आपल्या आत्म्याच्या सर्वसाक्षित्वाविषयी आपल्याला झालेली ही जाणीव आपण वेदान्तापुरती, परलोकापुरती मर्यादित न ठेवता, ऐहिक जीवनाच्या व्यवहारात पदोपदी जागृत ठेवावी अशी सध्याच्या समाजरचनेची अपेक्षा आहे आणि ही