पान:माझे चिंतन.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ११८ माझे चिंतन

मानवाला पद्धतशीर यमयातना भोगविण्याची यंत्रणा सिद्ध झाली आहे; आणि ज्या विज्ञान संशोधनामुळे मानवाची आतापर्यंत प्रगती झाली त्याचे बळ सत्ताधीशांनी हाती घेतल्यामुळे राज्ययंत्राला प्रतिकार करणे हे व्यक्तीला हळूहळू जास्त कठीण होत जाणार आहे. या व असल्या अनेक कारणांमुळे विवेकनिष्ठेची उपासना पुढील काळात किती अनन्यतेने होईल याविषयी मन साशंक होते. तरी पण नवीन पिढीच्या तरुणांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे की मानवाच्या प्रगतीचे ते एकमेव साधन आहे. या उपासनेवाचून मानवाला मानवत्वच लाभणार नाही. त्याचा पशु होऊन जाईल. म्हणून सत्ताधीशांनी मानवाच्या हातची ही महाशक्ती नष्ट करण्यासाठी ज्याप्रमाणे अनेक नव्या युक्त्या शोधून काढल्या आहेत, कल्पना लढविल्या आहेत, योजना आखल्या आहेत त्याचप्रमाणे त्या निष्फळ करून टाकण्यासाठी मानवानेही आपली बुद्धी लढविली पाहिजे व या महाशक्तीची जपणूक केली पाहिजे. असे केले तरच त्याला मानव ही पदवी सार्थतेने लावता येईल.

(ऑक्टोबर १९५२)