पान:माझे चिंतन.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विश्वाविरुद्ध ११७ 

प्रत्यक्ष व्यक्तिस्वातंत्र्य आले नव्हते, तरी आपल्याला त्याच मार्गाने जावयाचे आहे हा विचार तेथील लोकांना मान्य झाला होता. पूर्वेकडच्या देशांतही व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य यांचाच उद्घोष चालू झाला होता. सारांश, विवेकनिष्ठा ही एक महाशक्ती आहे व तिच्याच साह्याने आपल्या समाजाची भावी काळात प्रगती करून घ्यावयाची आहे, हा विचार त्या काळी जगन्मान्य होत आला होता. या वाटचालीत कोणी पुढे होते, कोणी अजून मागे होते, इतकाच फरक होता; पण जगाच्या वाटचालीची दिशा ठरून गेली होती. तिच्याबद्दल कोठे वाद नव्हता. यापुढे कालचक्र एकाएकी उलटे फिरू लागेल व सॉक्रेटिसाच्या काळाच्याही मागे आपण जाऊ, असे त्या वेळी कोणाच्या स्वप्नातही आले नसेल; पण आज जगात तसे दुर्दैवाने घडले आहे, घडत आहे. पूर्वीच्या काळी धर्माचार्यांनी मानवी जीवन एकपट नियंत्रित केले असेल तर आज त्याच्या शतपट नियंत्रित करावे असे धोरण हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन यांनी विसाव्या शतकात आखले. मानवाच्या विवेकाला अवसर तर द्यावयाचा नाहीच, उलट ती शक्ती अजिबात नष्ट करून टाकावयाची अशी या पुरुषांची महत्त्वाकांक्षा होती, आणि या ध्येयसिद्धीसाठी त्यांनी उपाययोजनाही तशीच केली. पूर्वी सॉक्रेटीस किंवा रॉजर बेकन हे धर्मद्रोही आहेत असे वाटले तर त्यांनाच फक्त देहान्तशासन द्यावे, त्यांनाच फक्त तुरुंगात ठेवावे असे सत्ताधीशांचे मर्यादित धोरण असे. आता तसे नाही; सॉक्रेटिस, बेकन, हस यांच्या बायकामुलांचा, आप्तांचा, मित्रांचा आता बळी घेतला जाईल. हेमलॉक् चा पेला सॉक्रेटिसाबरोबरच किंवा त्याच्या आधी त्याच्या बायकोला, मुलीला, मुलाला घ्यावा लागेल, आणि त्यांचे मृत्यू पाहूनही सॉक्रेटिसाचे धैर्य गळले नाही तर शेवटी त्यालाही विष घ्यावे लागेल. त्यामुळे विवेकनिष्ठेचा संग्राम पूर्वीपेक्षा शतपट अवघड होऊन बसला आहे. जॉन हस हा स्वतःचा देह चितेवर ठेवण्याचे धैर्य प्रकट करू शकेल पण त्याच्यादेखत त्याच्या लाडक्या लेकीला चितेवर उभी केली किंवा आपल्यामागून तिची हत्या होईल असे त्याला वाटले तर त्याचे धैर्य कितपत टिकेल याची शंका आहे. जर्मनीत अशा हत्या नित्य होत असत; रशियात आज होत आहेत. यामुळे जगाच्या भावी स्वरूपाविषयी विचारी लोकांच्या मनाला दारुण चिंता वाटू लागली आहे. मागल्या काळी मदांध राजे किंवा सुलतान लोकांच्या घरादाराचा असा विध्वंस करीत; पण ते त्यांच्या लहरीवर असे. आता