पान:माझे चिंतन.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ११६ माझे चिंतन

होती. राजा राममोहन रॉय, ईश्वरचन्द्र विद्यासागर, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, महात्मा फुले, रानडे, भांडारकर या सर्व थोर पुरुषांनी सनातन धर्मशास्त्रावर टीकास्त्र चालविले होते. पण तसे करताना त्यांनी आपल्या बाजूला पुरातन काळच्या अन्य ऋषींचे साह्य घेतले होते. त्यातल्या त्यात लोकहितवादी व महात्मा ज्योतिराव फुले यांचा हल्ला जास्त मूलगामी स्वरूपाचा होता. त्यांची बैठक बरीचशी विवेकनिष्ठेची होती; पण जुन्या शास्त्रांना जळजळीत आव्हान देऊन, 'आमच्या स्मृती आम्हीच रचणार,' अशी घोषणा करून, बुद्धीला पटत नसेल तर परमेश्वराचे वचनही आम्ही मानणार नाही, असे जाहीरपणे सांगून अनुभव, इतिहास, तर्क, यांच्याच केवळ आधाराने नव्या समाजरचनेचे संपूर्ण तत्त्वज्ञान सांगण्याचे कार्य, आणि या रीतीने विवेकनिष्ठा ही अद्भुत शक्ती या भूमीत निर्माण करण्याचे कार्य आगरकरांनी केले. लोकहितवादींनी सूत्ररूपाने नवे विचार आपल्या पत्रांतून मांडले होते. ज्योतिबांनी आपल्या कवनांतून, पोवाड्यांतून व संवादातून आपले विचार सूत्ररूपाने मांडले होते; पण एवढ्याने नव्या विचारांना तत्त्वज्ञानाची उंच प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. नव्या तत्त्वांचा सर्व बाजूंनी विचार करणे, आधार प्रमाणांनी त्यांचे मंडन करणे, तुलतेने त्यांचे तारतम्य दाखविणे, इतिहासाच्या साह्याने जगाच्या पसाऱ्यात त्यांचे स्थान दाखवून देणे, त्यांवर आलेल्या व येणाऱ्या आक्षेपांचे निरसन करणे, त्यांमुळे होणाऱ्या समाजरचनेचे स्वरूप दाखवून देणे, अशा पद्धतीने जेव्हा सूत्रमय विचारांचा प्रपंच केला जातो तेव्हा त्यांना नवतत्त्वज्ञानाचा दर्जा प्राप्त होतो. आणि हे सर्व करीत असताना त्या तत्त्वांचा प्रणेता समाजाकडून होणाऱ्या यातना सोसताना जे अग्निदिव्य करतो, अखिल विश्वाविरुद्ध केवळ आपल्या विवेकाने जेव्हा तो संग्राम करू लागतो तेव्हा त्यातून विवेकनिष्ठेची शक्ती निर्माण होते. ती शक्ती येथे आगरकरांनी निर्माण केलेली आहे.

मानवत्वाचे लक्षण

 आगरकरांचा संग्राम चालू होता त्या वेळी विवेकनिष्ठेचे माहात्म्य सर्वत्र मान्य झालेले होते. युरोपात इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, स्वीडन या देशांत ती शक्ती निर्माण होऊन वाढीस लागली होती. जर्मनी, इटली या देशांतही विचारांचे वळण बदलून विचारवंत लोक या मार्गाकडे वळले होते. पूर्व-युरोपात अजून