पान:माझे चिंतन.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विश्वाविरुद्ध ११५ 

असे ते म्हणतात.ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांना जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता यांविरुद्ध पुष्कळ विचार सांगावयाचे होते आणि मधूनमधून त्यांनी ते सांगितलेही आहेत; पण सनातन धर्मशास्त्राच्या विरुद्ध आम्ही हे स्वतःच्या विवेकाच्या आधाराने, त्या बळावर सांगतो, आणि तसे सांगण्याचा प्रत्येकस हक्क आहे, आमच्या बुद्धीला पटले, विवेकाला मानवले तरच आम्ही सनातन धर्मशास्त्र मानू, अशी भूमिका त्यांनी घेतली नाही. ती त्यांच्या स्वप्नातही नव्हती. जे काही थोडे त्यांना नवीन सांगावयाचे होते ते त्यांनी जुन्याच्या प्रवाहातच मिसळून दिले. त्याशी जमते घेत घेत, त्याच्यापुढे नमत, त्याला वंदन करीत त्यांनी ते सांगितले. याचासुद्धा थोडाबहुत उपयोग होतो, नाही असे नाही; पण यातून विवेकनिष्ठेची महाशक्ती कधीही निर्माण होत नाही, आणि ती नाही म्हणजे प्रगती नाही. 'अनॅलस् ऑफ युरोपियन सिव्हिलेझन' या अल्फ्रेड मेयरच्या ग्रंथाचा वर उल्लेख केला आहे. त्याप्रमाणे इ. स. १००० ते १८०० या काळाची भारताच्या संस्कृतीचा हिशेब घेणारी सनावळी तयार केली तर एवढ्या आठशे वर्षाच्या काळात काव्य, कादंबरी, नाटक, राजनीती, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, धर्म, पदार्थविज्ञान, रसायन, गणित, नृत्य, चित्र, शिल्प या क्षेत्रांत किती ग्रंथ व किती कलाकृती त्या सनावळीत आपल्याला नोंदता येतील याचा प्रत्येक भारतीयाने विचार केला आणि या आठशे वर्षांतील बहुतेक सनांपुढे आपल्याला जागा मोकळीच ठेवावी लागेल हे त्याच्या ध्यानात आले तर विवेकनिष्ठा ही केवढी उज्जीवक शक्ती आहे, मानवी संस्कृतीच्या प्रगतीला तिची किती आवश्यकता आहे, तिच्या अभावी समाजचे समाज कसे मृतवत् होतात, हे त्याला सहज कळून येईल. आणि अशा या विवेकनिष्ठेच्या भक्तीने संग्राम करण्यासाठी, आत्मबलिदान करण्यासाठी पूर्वकाळी भारतात कोणीच उभा राहिला नाही ही आपल्या संस्कृतीतली फार मोठी उणीव आहे, हे आपले फार मोठे दुर्दैव आहे, हा विचारही त्याला पटेल.

बंडखोरीचे तत्त्वज्ञान :

 विवेकनिष्ठेसाठी संग्राम करण्याचे धैर्य, विश्वाविरुद्ध एकट्याने उभे राहण्याचे हे मनःसामर्थ्य भरतभूमीत आगरकरांनी प्रथम प्रकट केले. पाश्चात्त्य विद्येचा प्रसार येथे होऊ लागल्यापासूनच या सामर्थ्याच्या जोपासनेची तयारी येथे होऊ लागली