पान:माझे चिंतन.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ११४ माझे चिंतन

हसचे प्रतिपादन असे. त्याला देहान्त शासन झाले ते त्यासाठीच. उज्जीवन- युगातले ब्रूनो, गॅलिलिओ हे जे विज्ञान-संशोधक, त्यांचे संग्राम तर केवळ यासाठीच होते. स्वतःची बुद्धी, अनुभव, तर्क, विवेक यांना अवसर मिळाला पाहिजे; सत्य ज्ञान याच साधनानी करून घेतले पाहिजे आणि ते प्राप्त करून घेण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीस मिळाला पाहिजे हे सत्य प्रस्थापित करण्यासाठीच त्यांनी देहदंड सोसला.

संग्राम नाही

 मानवाच्या विवेकबुद्धीवरची ही जी अनन्यनिष्ठा तिचा आग्रह धरणारा, तिच्यासाठी संग्राम करणारा, एकही पुरुष ब्रिटिशपूर्व भारतीय इतिहासात झाला नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. स्त्रिया, शूद्र, अंत्यज यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव अनेकांना होत होती. कष्टकरी जनता, शेतकरीवर्ग पिळून निघत आहे हेही अनेकांना दिसत होते; पण ज्यांच्यावर अन्याय्य होत होता ते लोक किंवा त्यांच्या वतीने समाजातल्या इतर वर्गातले लोक यांतून, ही समाजरचनाच आमूलाग्र बदलली पाहिजे, आणि समाजरचनेची नवी तत्त्वे ठरविण्याचा आम्हांला अधिकार असला पाहिजे, अशा बैठकीवरून प्रस्थापित धर्मशास्त्राशी संग्राम करण्यास कोणीही उभा राहिला नाही. ही विषमता अन्याय आहे असे पारमार्थिक क्षेत्रापुरते प्रतिपादन संत-साधू करीत होते; पण तेथेही ते संग्रामास सिद्ध झाले नाहीत. काहींनी रूढ धर्मशास्त्राविरुद्ध आचरण केले; पण तसे तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. एकनाथ महाराच्या घरी जेवावयास गेले. चातुर्वर्ण्य तर अनेकांनी उधळून दिले होते. रूढ धर्माप्रमाणे नामदेव, तुकाराम यांना वास्तविक धर्मप्रवचनाचा अधिकार नव्हता, तरी त्यांनी धर्मप्रवचने केली. मल्हारराव धनगर असल्यामुळे राजा होण्याचा अधिकार त्याला नव्हता, तरी तो राजा झाला; पण इतके करूनही चातुर्वर्ण्य हे समाज- रचनेचे तत्त्व चूक आहे, समाजविघातक आहे, नव्या तत्त्वाअन्वये समाजरचना झाली पाहिजे असे मात्र कोणी सांगितले नाही; तसा कोणी आग्रह धरला नाही. इतकेच नव्हे, तर लिहिण्याची जेव्हा वेळ येई तेव्हा ते सर्व सनातन धर्माचेच समर्थन करीत असत. चातुर्वर्ण्याचे समर्थन एकनाथांनी केले, एवढेच नव्हे तर तुकारामांनीही ते ठायी ठायी केले आहे. वर्णधर्म न पाळणारे लोक नरकात जातील