पान:माझे चिंतन.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विश्वाविरुद्ध ११३ 

तत्त्वज्ञानपूर्वक विरोध केला नाही, जुन्या धर्मशास्त्राला आव्हान देऊन त्याच्या जागी नवे धर्मशास्त्र स्वतःच्या विवेकाच्या आधारे प्रस्थापित करण्याची रंग कोणी दाखविली नाही, असा वरील म्हणण्याचा भावार्थ आहे. राजकारणशास्त्रात बंडाळी आणि क्रान्ती यांत भेद दर्शविला जातो. बंडाळी म्हणजे क्रान्ती नव्हे. शासनाचे, समाजरचनेचे, जे जुने तत्त्व असेल ते उच्छिन्न करण्याच्या हेतूने व नवे तत्त्व सांगून त्याअन्वये समाजरचना करण्यासाठी जी उठावणी केली असेल ती क्रान्ती होय; एरवी सर्व बंडाळ्या किंवा दंगेधोपे होत. त्याचप्रमाणे प्रस्थापित सनातन धर्माविरुद्ध या देशांत बंडाळ्या झाल्या, पण क्रान्ती झाली नाही. काही समाजधुरीणांनी देशकाल पाहून धर्मसुधारणा केल्या, पण त्या विवेबळाने बुद्धीला पटेल ते ग्राह्य मानू अशा तत्त्वाने, अशा आग्रहाने केल्या नाहीत. जुन्या स्मृतीऐवजी नव्या स्मृती आणणाऱ्यांनी पुन्हा वेदवचनाचे प्रामाण्य चालूच ठेविले. आठव्या शतकापासून तर नव्या स्मृती रचणेही बंद झाले. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही लोकांनी विवेकबुद्धीच्या आधाराने नवे सिद्धांत सांगण्याची जोखीम पत्करली नाही. शंकराचार्य, रामानुजाचार्य यांनी गीता, ब्रह्मसूत्रे, उपनिषदे यांवर भाष्ये लिहून त्या आधाराने स्वतःचे विचार मांडले. काही थोर विभूतींनी एक पाऊल आणखी पुढे टाकले. भगवान् गौतमबुद्ध, भगवान महावीर यांनी सनातन धर्माला विरोध केला तो स्वतःच्या विवेकबळाने केला हे खरे आहे; पण त्यांनी विवेकनिष्ठेचे तत्त्वज्ञान, म्हणजे बुद्धिप्रामाण्याचे तत्त्व प्रस्थापित केले नाही. वेदाधारे चालणाऱ्या शब्दप्रामाणाच्या अंध परंपरेऐवजी त्यांनी दुसऱ्या, पण शब्दप्रामाण्यपरंपराच निर्माण केल्या. यूरोपातील जीजस, सेंट पॉल, पीटर यांचे कार्य याच प्रकारचे होते. तेथील रूढ धर्माला त्यांनी विरोध केला, त्यावेळी अखिल समाजाविरुद्ध ते एकटेच उभे होते; पण असा समाजाविरुद्ध उभे राहण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला आहे हे मात्र त्यांना मान्य नव्हते. सॉक्रेटीस, रॉजर बेकन यांचे ते वैशिष्टय होते. स्वतःच्या विवेकाने, बुद्धीने, विचार करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, हे तत्त्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आत्मबलिदान केले. जॉन हसने यासाठीच मृत्यूला कवटाळले. "प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे. बायबलाचा, परमेश्वराच्या वचनांचा आपल्या मताप्रमाणे अर्थ लावण्याची प्रत्येकास मोकळीक मिळाली पाहिजे, इतकेच नव्हे, तर पाखंडी लोकांचे ग्रंथ वाचण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असले पाहिजे, कारण त्यावाचून सत्यज्ञान होणार नाही." असे जॉन