पान:माझे चिंतन.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ११२ माझे चिंतन

मेलिटस त्यांच्याविरुद्ध खवळून उठले, त्यांना त्यांनी देशोधडीला लावले व अथेन्समध्ये सॉक्रेटिसाचा पुतळा उभारला. याचा अर्थच असा की, सामर्थ्य आहे ते विवेकाने निर्माण केलेल्या सत्यात नसून त्या विवेकनिष्ठेसाठी केलेल्या आत्मबलिदानात आहे.

भारताचे वैगुण्य

 दुर्दैवाची गोष्ट अशी की, आपल्या अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत उज्ज्वल अशा भारतीय संस्कृतीत या सामर्थ्याचा अभाव हे फार मोठे वैगुण्य आहे; ही अत्यंत मोठी उणीव आहे. वेदकाळापासून तो इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराने येथे पाश्चात्त्य विद्येचा प्रभाव निर्माण होईपर्यंत या भूमीत सॉक्रेटिस झालाच नाही. आणि पाश्चात्त्य संस्कृतीचा मात्र प्रारंभच सॉक्रेटिसापासून झाला. येथे भारतीय संस्कृतीच्या बाजूने एक गोष्ट सांगणे अवश्य आहे. ख्रिस्ती धर्माने पाश्चात्त्य देशांत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ज्याप्रमाणे मानवी मनावर व बुद्धीवर अत्यंत कडक असे नियंत्रण ठेविले होते तसे धर्माचे हेकट व आततायी नियंत्रण या भूमीत कधीही कोणत्याही धर्माचार्यांनी प्रस्थापित केले नव्हते. धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य, विज्ञान या सर्व क्षेत्रांत येथे माणसांच्या मनाला, त्यांच्या विवेकाला, बुद्धीला पूर्ण स्वातंत्र्य होते. तत्त्वज्ञानातील नव्या मतासाठी किंवा विज्ञानातील नव्या संशोधनासाठी येथे कधीही कोणाचाही छळ झाला नाही, आणि या विवेकस्वातंत्र्यामुळेच येथे त्या त्या क्षेत्रात प्राचीन काळी भारताने असामान्य प्रगती केलेली होती. पण याचा अर्थ असा नव्हे की भारतात कोणत्याच प्रकारचा जुलूम व अन्याय नव्हता. वर्णसंस्था, जातिसंस्था, अस्पृश्यतेची रूढी, बालविवाह, सक्तीचे वैधव्य, सक्तीचे सहगमन इ. स्त्रियांवरील अन्याय, परदेशगमनबंदी, मनुष्य जुलमाने धर्मभ्रष्ट झाल्यास त्याच्या परावर्तनाची बंदी, अनेक प्रकारचे जाचक कर, राजसंस्थेचा व मदांध राजांचा जुलूम यांमुळे होणारा छळ मुळीच उपेक्षणीय नव्हता. आणि या सर्वाला धर्मशास्त्राचा- धर्मवचनांचा म्हणा किंवा रूढ धर्मशास्त्राचा म्हणा- पाठिंबा होता. पण या विरुद्ध तत्त्वज्ञान निर्माण करून त्याच्या प्रतिकारार्थ पाय रोवून संग्राम करण्यासाठी या भूमीत कधीही, कोणीही उभाच राहिला नाही.

विवेक X वेद

 जुन्या धर्मशास्त्राला किंवा रूढ धर्माला कोणी विरोधच केला नाही असे नव्हे