पान:माझे चिंतन.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विश्वाविरुद्ध १११ 

 जॉन हसची ही परंपरा पश्चिम-युयोपच्या थोर पुरुषांनी अखंड पुढे चालवून आपल्या बलिदानाने विवेकस्वातंत्र्याची जपणूक केली. म्हणूनच त्या भूमीत धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान, साहित्य, स्वातंत्र्य, धन व लोकसत्ता यांची प्रगती झाली. पुढे हळूहळू धर्माचार्यांचा विरोध कमी झाला. प्रत्यक्ष आत्मबलिदान करण्याचे प्रसंग कमी येऊ लागले; पण आपली नवी मते, नवे तत्त्वज्ञान, नवा धर्म, नवे शास्त्रीय सत्य यांच्या रक्षणासाठी, प्रसारासाठी, अखिल विश्वाविरुद्ध एकट्याने उभे राहण्याचे जे मनोधैर्य,- त्याची आवश्यकता मात्र प्रत्येक शतकात तितकीच होती. त्यासाठी होणाऱ्या शिक्षा सौम्य होत गेल्या इतकेच. लूथर, रूसो, व्हाल्टेअर यांना असाच लढा लढावा लागला. इतकेच नव्हे, तर गेल्या शतकाच्या उत्तरार्धात विज्ञानाची दोनतीनशे वर्षे प्रगती झाल्यानंतरही आपला उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त जगाला पटवून देण्यासाठी डार्विनला याच तऱ्हेचा संग्राम याच विवेकनिष्ठेच्या बळावर करावा लागला.
 विवेकनिष्ठेसाठी आत्मबलिदान करणे ही मानवी संस्कृतीच्या प्रगतीसाठी एक अत्यंत अवश्य असलेली गोष्ट आहे असे दिसते. कारण नुसत्या सत्याचे, नवतत्त्वाचे, नवविचाराचे आवाहन माणसाच्या मनाला पोचत नाही. त्या सत्याच्या मागे अग्निज्वाळाचा प्रकाश जेव्हा दिसतो तेव्हाच माणसाची दृष्टी तिकडे वळते, एरवी नाही. माणसाच्या बुद्धीचे हे फार मोठे वैगुण्य आहे; पण ते आहे खरे. केवळ तर्कशुद्धता, ऐतिहासिक प्रमाणे, स्वानुभव, इतकेच काय, पण दृक्प्रत्यय हासुद्धा मानवी मनाला नवसत्याकडे वळविण्यास असमर्थ आहे. सनातनधर्मशास्त्र, वेदवचने, प्रस्थापित रूढी यांच्याकडून मानवाची दृष्टी काढून ती नव्या तत्त्वांकडे वळवावयाची असेल तर 'आत्मार्पण' हा एकच उपाय आहे; आणि हे जाणूनच सॉक्रेटिसाने बुद्धिपुरस्सर आत्मबलिदान केले. सॉक्रेटिसाचे नवे तत्त्वज्ञान अमर झाले ते त्यामुळेच. त्याच्या मृत्यूपूर्वी, त्याचा खटला चालू असता, त्याचे तत्त्वज्ञान केवळ सत्यतेच्या दृष्टीने पाहता नंतरच्या इतकेच शुद्ध होते; पण त्या सत्याच्या ठायी सामर्थ्य निर्माण झाले नव्हते. लोकांच्या मनात घुसून तेथे दृढ बैठक धरून बसण्याची शक्ती त्या सत्याच्या ठायी नव्हती. देहदंड आनंदाने सोसण्यात सॉक्रेटिसाने जे व्यक्तित्वाचे तेज प्रगट केले त्या तेजामुळे त्या सत्याच्या ठायी ती शक्ती निर्माण झाली. त्याने लोकमताची एकदम पकड घेतली; आणि ज्यांनी त्याला शिक्षा केली होती तेच लोक आता त्याचे शत्रू जे अनिटस व