पान:माझे चिंतन.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ११० माझे चिंतन

नसला येताच धर्मगुरूनी त्याला अंधारकोठडीत रवाना करून त्याचे अनन्वित हाल केले. त्याच्यावर नास्तिकपणा, पाखंडीपणा व त्या विचारांचा प्रसार करणे हे आरोप होते व 'आपले सर्व प्रतिपादन चुकीचे असून आपल्याला त्याबद्दल पश्चात्ताप होत आहे,' असे त्याने लिहून द्यावे अशी धर्माचार्यांनी त्याला आज्ञा दिली. 'पोप, सम्राट, राजे, सरदार यांच्या आज्ञा काहीही असल्या तरी आपल्या विवेकबुद्धीला पटल्यावाचून त्या कोणीही मानू नयेत,' असे सांगणारा हा पुरुष धर्माचायची ही आज्ञा कशी मानणार ?
 परमेश्वराच्या मंदिरात राहून पापपुण्याच्या मालाची अडतेगिरी करणाऱ्या या वणिग्-जनांना तेथून हाकलून लावण्याची वायक्लिफच्या ग्रंथावर हात ठेवून जॉन हसने प्रतिज्ञा केली होती. आज प्रागच्या धर्माचार्यांनी वायक्लिफचे ग्रंथ जाळून टाकण्याचा हुकुम दिला. उद्या कदाचित...!
 जॉन हस लहान असतानाच त्याने एक प्रयोग केला होता. एकदा तो आईच्या मांडीवर डोके ठेवून निजला होता. पलीकडे शेकोटी होती. विस्तवाने भाजल्यावर कसे वाटते हे पाहण्यासाठी त्याने आपला हात सहज त्या शेकोटीत खुपसला ! त्याची आज त्याला आठवण झाली. त्या वेळी अग्निज्वाळा या अगदी असह्य झाल्या होत्या असे नाही !
 'तू पोपचा अधिकार मानीत नाहीस, मग कोणाच्या अधिकाराने तुझे प्रतिपादन तू करतोस ?' न्यायासनावरील धर्माचार्यांनी त्याला विचारले.
 'मला आधार फक्त माझ्या विवेकबुद्धीचा आहे !' हसने उत्तर दिले.
 'पण शेकडो पंडित प्रतिज्ञेवर सांगत आहेत की, तुझी मते असत्य आहेत. हे सर्व धर्मगुरू, शास्त्री, दशग्रंथी विद्वान लोक यांच्यापेक्षा आपण जास्त शहाणे आहोत असे तुझे म्हणणे आहे काय ?'
 'माझी निष्ठा परमेश्वरावर व माझ्या सदसद्विवेकबुद्धीवर आहे. शेकडो नव्हे, लक्षावधी शास्त्री व धर्माचार्य जरी विरुद्ध निर्णय देऊ लागले तरी माझ्या विवेकाची साक्ष त्यापेक्षा मला जास्त वंदनीय वाटते.'
 या विवेकबळाच्या आधारानेच जॉन हस शांतपणे चितेवर चढला. अग्नीच्या ज्वाळा वरवर चढू लागल्या तेव्हा तो आपल्या मित्रांना म्हणाला, 'शोक करू नका. त्या ज्वाळा जड शरीराला जाळतील. सत्याला जाळण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नाही.'