पान:माझे चिंतन.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विश्वाविरुद्ध १०९ 

कलाकृती निर्माण झालेली नाही. या तीन शतकांत या देशांची नावे या इतिहासात येतच नाहीत. पोलंड, स्पेन, इटली हे देश आरंभी अग्रमालिकेत दिसतात व ते योग्यच आहे. कारण बुद्धिस्वातंत्र्याचा आग्रह धरणारी उज्जीवनाची चळवळ प्रथम इटलीतच सुरू झाली होती. पोलंडमध्येही विद्येचे पुनरुज्जीवन वेगाने होत होते आणि स्पेनमध्येही आरंभी हे वारे पोचले होते; पण पुढे तेथील मदांध सत्ताधीशांनी अंध धर्मश्रद्धेचे वातावरण अट्टाहासाने निर्माण केल्यामुळे आणि ते भेदून टाकण्यासाठी आत्मबलिदान करणारे पुरुष त्या भूमीत निर्माण न झाल्यामुळे हे देश संस्कृतीच्या इतिहासात दिसेनासे होतात. १८५० नंतर पुन्हा त्यांचे ओझरते दर्शन होऊ लागते. या वेळी पूर्व युरोपातील देशही संस्कृतीच्या क्षितिजावर थोडे येऊ लागतात. आणि याचे कारण हेच की, तेथेही आता स्वतंत्र चिंतन, व्यक्तिस्वातंत्र्य व त्यासाठी आत्मार्पण ही वृत्ती प्रभावी होऊ लागली होती. पश्चिम युरोपातील देश मात्र आरंभापासून सारखे आपल्या डोळ्यांपुढे उभे आहेत.

सत्य जळत नाही

 पश्चिम-युरोपातील इंग्लंडखेरीज इतर देशांत विवेकाची उपासना इंग्लंडइतक्या निष्ठेने झाली नाही तरी, तेथे सॉक्रेटिस, रॉजर बेकन, वायक्लिफ यांची परंपरा चालविणारे थोर पुरुष मुळीच निर्माण झाले नाहीत असे नाही. मधूनमधून अशा महाभागांचे अवतार तेथे होत होते म्हणूनच त्यांची काही मर्यादेपर्यंत तरी प्रगती झाली. जॉन हस हा असाच एक अवतारी पुरुष होता. बोहेमियांतील हसिनेट्झ् या खेड्यात जॉन हसचा (१३६९-१४१५) जन्म झाला. आपल्या कर्तृत्वाने चढत जाऊन प्राग विद्यापीठात तो प्राध्यापक झाला. तेथेच त्याने धर्मचिंतन सुरू केले. याच सुमारास जॉन वायक्लिफचे ग्रंथ त्याच्या वाचनात आले आणि त्याच्या मनात क्रांतिकारक विचार उद्भवले. प्रस्थापित धर्म- त्यातील कर्मकांड, धर्माचार्यांचे विलासी जीवन, त्यांचा धनलोभ व त्यांची पापकृत्ये यांवर तो कडक टीका करू लागला. अर्थातच रोमच्या धर्मपीठाची त्याच्यावर वक्र दृष्टी झाली. पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट सिसिग्मंड हा रोमच्या पोपच्या हातचे बाहुले होता. त्याने जॉन हसला कॉन्स्टनस येथील न्यायासनापुढे उपस्थित राहण्यास फर्मावले. प्रथम सम्राटाने त्याला अभय दिले होते; पण हस कॉन्स्ट-