पान:माझे चिंतन.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १०८ माझे चिंतन

ळली होती हे खरे; पण या प्रत्येक देशात काही ना काही कारणामुळे- आणि मुख्य म्हणजे लोकांनी अनन्यभक्ती न दर्शविल्यामुळे, या लाटा मंदावल्या आणि इटली, स्पेन व पोलंड या देशांत तर त्या अगदी विरून नाहीशा झाल्या. त्यामुळे ते देश पुढे तीन-चारशे वर्षे कर्दमातच रुतून बसले असे इतिहास सांगतो. सर्बिया, बोन्सिया इ. आजचे युगोस्लाव्हियातील देश, आणि बल्गेरिया, रुमानिया, ऑस्ट्रिया, हंगेरी, ग्रीस आणि रशिया येथे उज्जीवनाच्या लाटा पोचल्याच नव्हत्या. अर्थात त्यांचे डोके अल्पकाळही कर्दमातून वर निघाले नाही. विवेकनिष्ठा- विवेकासाठी आत्मबलिदान करण्याइतकी उत्कट निष्ठा- ही समाजाच्या उन्नतीस अत्यंत अवश्य असलेली अशी प्रेरक शक्ती आहे. ती निष्ठा जेथे नाही, सर्व विश्वाविरुद्ध एकट्याने उभे राहण्याचे सामर्थ्य ज्या समाजातील व्यक्तीच्या ठायी नाही, तो समाज पशुतेच्या वर येत नाही आणि एकदा आला असला तरी पुढे ही निष्ठा जर मंदावली तर तो पुन्हा अधोगामी होऊ लागतो.

पश्चिम व पूर्व युरोप

 'अनॅलस् ऑफ युरोपियन सिव्हिलिझेशन' या नावाचा एक ग्रंथ अल्फ्रेड मेयर या पंडिताने तयार केला आहे. त्यात त्याने १५०१ ते १९०० या चार शतकांतील संस्कृतीच्या प्रगतीची सनावली दिली आहे. १५०१ हे साल घ्यावयाचे व युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, बेल्जम, हॉलंड, स्वीडन, जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, हंगेरी, झेकोस्लोव्हाकिया, बल्गेरिया, रुमानिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, रशिया या देशांत त्या साली काव्य, नाटक, कादंबरी, चित्रकला, शिल्पकला, संगीत, रसायन, पदार्थविज्ञान, ज्योतिष, गणित, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान या मानवी संस्कृतीच्या प्रत्येक क्षेत्रात कोणता ग्रंथ वा कलाकृती निर्माण झाली हे क्रमाने सांगावयाचे, अशी त्याची पद्धत आहे. असा चारशे वर्षांचा प्रत्येक देशातील संस्कृतीचा इतिहास त्याने दिला आहे. साहित्य, कला, विज्ञान व तत्त्वज्ञान हीच मानवाची संस्कृती आणि ही संस्कृती हेच मानवत्वाचे लक्षण हे ज्यांना मान्य आहे त्यांना विवेकनिष्ठा व ही संस्कृती यांचा अविभाज्य संबंध कसा आहे, हे वरील इतिहासावरून अगदी सहज समजून येईल. साधारणपणे पहिल्या तीनशे वर्षांत पूर्व-युरोपातील देशांत म्हणजे ऑस्ट्रिया, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया, युगोस्लाव्हिया, रशिया या देशांत संस्कृतीच्या एकाही क्षेत्रात एकही ग्रंथ वा